Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

"महिलांचा विचार करणारे नरेंद्र मोदी देशातील पहिले पंतप्रधान", उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

फडणवीस जनतेला संबोधीत करताना म्हणाले, राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांना बसायला जागा आहे. तुमच्यासाठी त्यांच्या इंजिनमध्ये जागा नाही.
Published by :

जेव्हा पुरुषासोबत एक महिला आपल्या पायावर उभी राहते, त्यावेळी संपूर्ण कुटुंब आपल्या पायावर उभं राहतं. नरेंद्र मोदी देशाचे पहिले प्रधानमंत्री आहेत, ज्यांनी महिलांचा विचार केला. मोदींनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी २४ हजार कोटी रुपये दिले. मोदी संपूर्ण आदिवासी समाजात परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. सबका साथ, सबका विकास म्हणून मोदींची ट्रेन विकासाच्या दिशेनं पुढे जात आहे. दुसरीकडे काय अवस्था आहे, राहुल गांधींकडे डब्बेच नाही आहेत. तिकडे सर्व इंजिनच आहेत. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार, उद्धव ठाकरे म्हणतात, मी इंजिन आहे. स्टॅलिन, मुलायम सिंग यांचा मुलगा आणि लालुप्रसाद यादवचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे. ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे. यांच्या इंजिनमध्ये बसायला सामान्य माणसाला जागा नसते. इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो, असं म्हणत फडणवीसांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर टीकास्त्र डागलं आहे. फडणवीस हिना गावित यांच्या महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.

फडणवीस जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांना बसायला जागा आहे. तुमच्यासाठी त्यांच्या इंजिनमध्ये जागा नाही. शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळे यांच्यासाठी जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंसाठी जागा आहे. तुमच्यासाठी त्यांच्या इंजिनमध्ये जागा नाही. त्यांचं एक इंजिन मुंबईकडे जातं. दुसरं इंजिन दिल्लीकडे जातं. तिसरं इंजिन बारामतीकडे जातं. चौथं इंजिन चैन्नईकडे जातं. त्यामुळे त्यांचं इंजिन हालतही नाही, डुलतही नाही आणि चालतही नाही. राहुल गांधींचं इंजिन ठप्प पडलेलं इंजिन आहे. तर विकासाकडे जाणारं इंजिन हे मोदींचं इंजिन आहे.

महायुतीतील सर्व घटकपक्ष मोदींच्या सोबत आहेत. वेगवेगळे पक्ष मिळून आपली महायुती तयार झाली आहे. दुसरीकडे राहुल गांधी आहेत. त्यांच्यासोबत २४ पक्षांची खिचडी आहे. आपली महायुती विकासाची ट्रेन आहे. या ट्रेनला मोदींचं भक्कम इंजिन लागलं आहे. वेगवेगळ्या पक्षाचे डब्बे त्या इंजिनला लागले आहेत. या डब्ब्यांमध्ये दिनदलित, गोरगरिब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्यांक, भटके, विमुक्त, ओबीसी, सर्वांसाठी बसायला जागा आहे. गेल्या दहा वर्षात मोदींनी चमत्कार केला. हे विकासाचं मोदी मॉडेल काय आहे, अशी चर्चा जगातले अर्थशास्त्री करत आहेत. दहा वर्षात मोदींनी २५ कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर आणलं. २० कोटी लोक झोपडीत राहायचे, पण मोदींमुळे आज ते पक्क्या घरात राहायला गेले.

५० कोटी लोकांच्या घरात चूल होती, त्यांच्या घरात मोदींनी गॅस दिला. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही ६० कोटी लोकांना पिण्याचं पाणी नव्हतं, महिलांना हंडा घेऊन नळावर, विहीरीवर जावं लागत होतं. पण त्यांच्या घराजवळ पाणी पोहोचवण्याचं काम मोदींनी केलं. ८० कोटी लोकांना मोदी मोफत रेशन देत आहेत. जवळपास ६० कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेतून मोफत उपचार मोदींनी दिलं आहे. मोदींनी मुद्राच्या योजनेतून ६० कोटी लोकांना १० लाखांचं लोन विनातारण दिलं.

आता १० लाखांऐवजी २० लाखांचं लोन मोदी देणार आहेत. ५० टक्क्यांहून अधिक महिलांना मोदींनी स्वत:च्या पायावर उभं केलं. देशात ८० लाख बचत गट मोदींनी तयार केले. ८ लाख कोटी रुपये त्यांना दिले. त्या माध्यमातून १० कोटी महिलांना मोदींनी आपल्या पायावर उभं केलं. ३ कोटी महिलांना मोदी लखपती दीदी बनवत आहेत. येत्या काळाता पूर्ण १० कोटी महिला लखपती होतील, असा मोदींचा अजेंडा आहे.

ही निवडणूक साधी नाही. ही निवडणूक ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका किंवा विधानसभेची निवडणूक नाही. ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. आपल्याला देशाचा नेता निवडायचा आहे. कोणाच्या हातात हा देश सुरक्षित राहील, कोणाच्या हातात हा देश समृद्ध होईल, कोण या देशाला पुढे नेऊ शकले, सामान्य माणसाच्या आशा-आकांशा, अपेक्षा कोण पूर्ण करेल, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीत आपल्याला दोन गट दिसत आहेत. एकीकडे नरेंद्र मोदी आहेत, ज्यांच्या नेतृत्वात आपण सर्वजण काम करत आहोत, असंही फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com