पंतप्रधानांच्या दौऱ्याचा नोकरदारांना फटका; ऐन गर्दीवेळी वर्सोवा-घाटकोपर सेवा बंद ठेवणार

पंतप्रधानांच्या दौऱ्याचा नोकरदारांना फटका; ऐन गर्दीवेळी वर्सोवा-घाटकोपर सेवा बंद ठेवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावेळी वर्सोवा-घाटकोपर ही मेट्रो १ सेवा बंद ठेवली जाणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. अनेक विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. बीकेसीच्या मैदानावर भाजप मोठा कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावेळी वर्सोवा-घाटकोपर ही मेट्रो १ सेवा बंद ठेवली जाणार आहे. सायंकाळी ५.४५ ते ७.३० दरम्यान ही सेवा बंद ठेवली जाणार आहे.

ती वेळ ऐन गर्दीची असल्याने त्याचा मुंबईतील नोकरदारांना जबर फटका बसणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या विस्तारित मार्गिकांचे लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान बीकेसीहून या कार्यक्रमासाठी येणार आहेत. हा कार्यक्रम अंधेरी पूर्व येथील मेट्रो ७ वरील गुंदवली स्थानकावर होणार आहे. हे स्थानक मेट्रो १ च्या पश्चिम द्रुतगती मार्ग स्थानकाच्या जवळ आहे. पण सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण मेट्रो मार्गिकाच बंद ठेवली जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com