संकल्प पत्राचं अनावरण करताना श्रीकांत शिंदे म्हणाले; "खुद्द PM नरेंद्र मोदींनी मला पत्र पाठवलं आणि..."
Shrikant Shinde Press Conference : २०१४ आणि २०१९ ला जनतेनं मोठ्या मताधिक्क्यानं मला निवडून दिलं. २०१४ ला अडीच लाखांच्या आणि २०१९ ला साडेतीन लाखांच्या मताधिक्क्यानं मी निवडून आलो. सर्व मतदारांचं खूप खूप धन्यवाद. त्यांच्या आशीर्वादाने गेले दहा वर्ष मी मतदारसंघात काम करु शकलो. देशात नरेंद्र मोदींच्या आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात मी काम करु शकलो. मी शिवसेना, भाजप, मनसे, राष्ट्रवादी, आरपीआय आणि रासपमधील सर्व कार्यकर्त्यांचं खूप आभार मानतो. जेव्हापासून प्रचार सुरु झाला आहे, तेव्हापासून सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकदिलाने मतदारसंघात काम करत आहेत. आता प्रचाराचा शेवट आहे. कार्यकर्त्यांमध्ये आणि लोकांमध्ये मोठा उत्साह आहे, असं कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले. श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या संकल्पपत्राचे अनावरण केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आनंद परांजपे, मनसे आमदार राजू पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
श्रीकांत शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले, भिवंडी आणि कल्याण लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल कल्याणमध्ये सभा घेतली. आमच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली आणि जिंकण्यासाठी आम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींच्या नेतृत्वात गेले दहा वर्ष आम्ही करत आहोत. नरेंद्र मोदींनी स्वत: पत्र पाठवून मी केलेल्या विकासकामांचं कौतुक केलं आहे. आम्ही हेल्थ केअर, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जे काम करतोय, ते पाहून त्यांनी पत्र लिहिलं आहे. माझ्या पाठीवर त्यांनी कौतुकाची थाप मारली आहे. मी त्यांचं धन्यवाद करतो. आज आम्ही संकप्ल पत्राचं अनावरन केलं आहे. पुढील पाच वर्षात आपण या मतदारसंघात काय काय करणार आहोत, ते या संकल्प पत्रात मांडलं आहे.
या भागातील कमी क्षेत्रात सर्वात जास्त लोक राहतात. लाखो लोक रेल्वेनं प्रवास करतात. लोक रेल्वेवर अवलंबून आहेत. तसच रस्त्यानेही लोक प्रवास करतात. अशापरिस्थितीत रेल्वेवर जास्त भर देऊन, रेल्वेच्या माध्यमातून लोकांच्या समस्या कशा सुटतील, त्यासाठी मी प्रयत्न केले. रेल्वे आणि रस्त्यांसाठी मी सहा हजार कोंटीची कामे या मतदारसंघात करु शकलो. रेल्वे सुविधा, रेल्वेची पाचवी-सहावी, तिसरी-चौथी लाईन असेल, या सर्व गोष्टी गेल्या दहा वर्षात मार्गी लावू शकलो. गेल्यावर्षीच्या जाहीरनाम्यात दिलेली ९० टक्के आश्वासनं मी पूर्ण केली आहेत. आता आम्ही नवीन संकल्प पत्र जाहीर केला आहे. यामध्ये पुढच्या पाच वर्षांचे विषय नमूद करण्यात आले आहेत.