Narendra Modi
Narendra Modi

सोलापूरमध्ये PM नरेंद्र मोदींचं 'इंडिया'आघडीवर शरसंधान, म्हणाले; "देशाला भ्रष्टाचार, दहशतवादात..."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. मोदी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारसभेत सोलापूरमध्ये बोलत होते.
Published by :
Naresh Shende
Published on

काँग्रेसने २०१४ आधी देशाला भ्रष्टाचार, दहशतवादात ढकललं होतं. आपल्या कलंकित इतिहासानंतर काँग्रेस देशात पुन्हा सत्ता आणण्याचं स्वप्न पाहत आहे. पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाचे इंडिया आघाडीचा डब्बा घसरला आहे, याचा त्यांना अंदाज नाही. तुम्ही दहा वर्षांपर्यंत मोदींना ओळखलं आहे. त्यांचं एक एक पाऊल तुम्ही पाहिलं आहे. मोदींबद्दल तुम्हाला एक एक शब्द माहित आहे. इंडिया आघाडीत नेत्याच्या नावावर महायुद्ध चालू आहे. ज्याचं नाव माहित नाही, ज्यांचा चेहरा माहित नाही, त्याच्या हातात एव्हढा मोठा देश कुणी चुकूनही देऊ शकतो का, आता त्यांनी नवीन फॉर्म्युला आणला आहे. पाच वर्षात पाच प्रधानमंत्री. प्रत्येक वर्षाला यांच्याकडे वेगवेगळा प्रधानमंत्री. नकली शिवसेना म्हणते, त्यांच्याकडे प्रधानमंत्रीपदासाठी अनेक लोक आहेत. तुम्ही मला सांगा, पाच वर्ष पाच प्रधानमंत्रीच्या फॉर्म्युल्याने एव्हढा मोठा देश चालणार आहे का, आपण त्या दिशेनं कधी जाऊ शकतो का, पण त्यांच्याकडे हाच मार्ग राहिला आहे. कारण त्यांना देश चालवायचा नाही, त्यांना तुमच्या भविष्याची चिंता नाही. त्यांना मलाई खायची आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. मोदी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारसभेत सोलापूरमध्ये बोलत होते.

मोदी जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, महाराष्ट्र सामाजिक न्यायाची भूमी आहे. या भूमीत महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना प्रेरणा दिली. तुम्ही काँग्रेसचं ६० वर्षांचं सरकार पाहिलं आहे आणि मोदींचं १० वर्षांचं सरकारही पाहिलं आहे. काँग्रेसने ६० वर्षात एससी, एसटी, ओबीसींच्या प्रत्येक हक्क काढून टाकण्याचा प्रयत्न केला. पण मोदींशी तुमचं हृदयाचं नातं आहे. दहा वर्षात आम्ही सत्याने काम केलं. मी आज गरिबांची सेवा करून त्यांचं कर्ज चुकवत आहे. आम्ही ओबीसींना सामाजिक दर्जा दिला. मेडिकल परीक्षेत ओबीसींना आरक्षण दिलं. अटल बिहारी वाजपेयीनंतर मोदींनीही दहा वर्ष वाढवले. आम्ही दलित, आदिवासी, ओबीसींचा हक्क हिसकावला नाही.

सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी दहा टक्के आरक्षण त्यांनाही दिलं. देशात आग लागली नाही. देशात पुतळे जाळले नाहीत. लोकांनी याचं स्वागत केलं. समाजाला जोडण्याचं काम आम्ही करत आहोत. गरीब मातेच्या मुला-मुलींना मला डॉक्टर, इंजिनीयर बनवायचं आहे. जर तुम्हाला डॉक्टर, इंजिनीयर बनायचं असले, तर तुम्ही मराठीत शिकू शकता. इंग्रजी नाही आली तरी तुम्हाला या हुद्द्यावर पोहचता येईल, हेच मोदींचं स्वप्न आहे. २०१४ मध्ये तुम्ही एनडीला प्रचंड मतदान केलं. म्हणून एनडीने दलिताच्या मुलाला राष्ट्रपती बनवलं. २०१९ ला पुन्हा एकदा तुम्ही एनडीएला सत्तेत आणलं. त्यानंतर आम्ही देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आदिवासी मुलीला भारताचं राष्ट्रपतीपद दिलं. स्वातंत्र्यानंतर अशा गोष्टी पहिल्यांदाच झालं आहे.

लोकसभा, राज्यसभा असो, सर्वच ठिकाणी सर्वात जास्त उमेदवार भाजपचे निवडून येतात. काँग्रेस आणि इंडिया आघाडीवाले ओबीसीच्या मुद्द्यांवर खोटं बोलत आहेत. मोदींना रोज शिवीगाळ करणं, हाच इंडिया आघाडीच्या भाषणाचा मुद्दा आहे. गेली कित्येक वर्ष काँग्रेसने एससी, एसटी, ओबीसींची फसवणू केली. काँग्रेस आणि इंडिया आघाडीवाले सातत्याने खोटं बोलत आहे. संविधान बदलणार, आरक्षण संपवून टाकणार, असं ते बोलत आहे. आज खुद्द बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा असेल, तर ते सुद्धा आरक्षण संपवून टाकू शकत नाही. मोदींचा तर प्रश्नच उरत नाही. आमच्या सरकारच्या मागील पाच वर्षांच्या कामकाज पाहा, कुठेही तुम्हाला खोटं काम दिसणार नाही.

मी आरक्षणाला मजबूत करण्यासाठी कटीबद्ध आहे. मी देशात जास्तीत जास्त उमेदवारांचा विजय मागत आहे, कारण मला प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं आहे. काँग्रेसने तुमच्या विरोधात केलेल्या षडयंत्राला धुडकावून टाकायचं आहे. म्हणून मी तुमच्याकडे आशीर्वाद मागायला आलो आहे. मोदींना मजबूत करा. जनतेचा हा उत्साह पाहून असं वाटतंय, फिर एक बार मोदी सरकार. मी सोलापूरात तुमच्याकडे काहीतरी मागण्यासाठी आलो आहे. मला धनसंपत्ती नाही पाहिजे. मी तुमचे आशीर्वाद मागायला आलो आहे. पुढील पाच वर्षांसाठी तुम्ही विकासाच्या गॅरंटीला निवडणार, असा विश्वासही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com