Narendra Modi
Narendra Modi

कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यातून PM मोदींचा 'मातोश्री'वर निशाणा; म्हणाले, आज बाळासाहेब असते, तर..."

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे यांच्यासह इंडिया आघाडीवर घणाघाती टीका केली आहे. मोदी संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारसभेत कोल्हापूर येथे बोलत होते.
Published by :

जे लोक सनातनच्या विनाशाबद्दल बोलतात, त्या लोकांना इंडिया आघाडीचे लोक महाराष्ट्रात बोलवून त्यांचा सन्मान करतात. हे दृष्य बघितल्यावर असं वाटतं, बाळासाहेब ठाकरे यांच्या मनाला किती दु:ख झालं असतं. नकली शिवसेना इंडिया आघाडीच्या खांद्याला खांदा लावून जात आहेत. आज बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांना खूप दु:ख झालं असतं. काँग्रेसचे नेते म्हणतात, तुमची संपत्ती, महिलांचे दागिने, सोन्या-चांदीची चौकशी करणार, कारण ते सांगतात, आमचं या देशावर पहिलं हक्क आहे. काँग्रेस स्वत:च्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. काँग्रेस देशाला लुटण्याचं स्वप्न पाहत आहे, ते तुम्ही पूर्ण करणार आहेत का, महाराष्ट्राची भूमी सामाजिक न्यायचं प्रतिक आहे. पण इंडिया आघाडीनं सामाजिक न्यायाला उद्ध्वस्त करण्यासाठी रणनीती आखली आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे यांच्यासह इंडिया आघाडीवर घणाघाती टीका केली आहे. मोदी संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारसभेत कोल्हापूर येथे बोलत होते.

मोदी जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, कोल्हापूरला महाराष्ट्राचा फुटबॉल हब म्हटलं जातं. फुटबॉल येथील तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. फुटबॉलच्या भाषेत सांगायचं झालं तर, दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप आणि एनडीए २-० ने पुढे आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीनं देशविरोधी आणि नफरतीच्या राजकारणाचे दोन सेल्फ गोल केले आहेत. म्हणून हे पक्क झालं की, फिर एक बार मोदी सरकार. आता तिसऱ्या टप्प्यात फुटबॉल कॅरिअरची जबाबदारी कोल्हापूरच्या जनतेकडे येणार आहे. मला विश्वास आहे, तुम्ही असा गोल टाकणार, पुढील सर्व राऊंड इंडिया अलायन्सचा दारुण पराभव होईल. ही निवडणूक विकसीत भारताच्या संकल्पाची निवडणूक आहे. पण काँग्रेसला जेव्हा याबाबत महित झालं की, विकासाच्या शर्यतीत ते एनडीएची बरोबरी करु शकत नाही.

त्यानंतर त्यांनी त्यांची रणनीती बदलली. इंडिया आघाडीने देशविरोधी अजेंडा राबवण्यास सुरुवात केली. काँग्रेसचा अजेंडा आहे की, त्यांचं सरकार आल्यावर आर्टिकल ३७० परत घेऊन येणार. मोदींच्या नेतृत्वाला हटवण्याची कुणाची हिंमत आहे का. यांचं सरकार आलं, तर हे सीएए कायदा बंद करतील. जर त्यांनी असं केलं, तर त्यांची हालत काय होईल, हे माहित आहे का, इंडिया आघाडी सरकारच्या दरवाज्यात पोहोचू शकतात का, पाच वर्ष यांना संधी मिळाली, तर पाच वर्ष पाच प्रधानमंत्री करून टाकतील. कर्नाटक आणि तामिळनाडूत काँग्रेस इंडिया आघाडी काय भाषणे करत आहेत, दक्षिण भारताला तोडून वेगळं देश करण्याची मागणी करत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी काँग्रेसच्या या अजेंड्याला स्विकारेल का, यांना कठोर उत्तर दिलं पाहिजे. अयोध्येत ५०० वर्षांचं राम मंदिराचं स्वप्न पूर्ण झालं. राम मंदिराला विरोध करणारी काँग्रेस अधोगतीला गेली आहे. राम मंदिरच्या निमंत्रण पत्रिकेला काँग्रेसने नाकारलं. राम मंदिर होऊ नये म्हणून अयोध्येतील अन्सारी कुटुंब आयुष्यभर कोर्टात केस लढत राहिलं. पण न्यायालयाने जेव्हा म्हटलं, हे राम मंदिर आहे. तेव्हा अन्सारी स्वत: प्रभू राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याला येऊन श्री रामांना शरण आले. डीएमके पक्ष म्हणतो, सनातन डेंग्यू, मलेरिया आहे.

काँग्रेस संविधान बदलून दलितांचं आरक्षण धर्माच्या नावावर वाटण्याचा प्रयत्न करेल. ज्या लोकांनी कर्नाटकात मागासवर्गीयांचं आरक्षण हिसकावून घेतलं आहे, त्यांची एकही जागा विजयी होता कामा नये. आम्ही दहा वर्षात विकासकामे करण्यासाठी अजेंडा राबवला. एनडीएने आत्मनिर्भर भारत अभियान सुरु केलं. कारण देशात उद्योग वाढवेत. जगात सर्वात जास्त मोबाईल फोन बनवणारा भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. भाजपने घोषणा केलीय, मुद्रा योजनेच्या माध्यमातून विना गॅरंटी आता २० लाखांचं कर्ज मिळेल. विकसीत भारताची ही गॅरंटी आहे. आमच्या सरकारने रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून लाखो लोकांना नोकऱ्या दिल्या, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com