Ajit Pawar : मोठा ट्विस्ट! प्रचार संपताच पोलिसांची धडक कारवाई, अजित पवारांना मोठा धक्का?
राज्यात महापालिका निवडणुकांमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रचार संपताच मतदानाची उत्सुकता वाढली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अचानक मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांचे जवळचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या कंपनीवर पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचने कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नरेश अरोरा यांच्याशी संबंधित ‘डिझाईन बॉक्स’ या कंपनीच्या पुण्यातील कार्यालयात पोलिसांनी छापा टाकून कागदपत्रांची तपासणी केली. नेमकी कोणत्या प्रकरणात ही चौकशी सुरू आहे, याबाबत पोलिसांकडून अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आणि पुढील काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर असताना ही घटना घडल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अजित पवार पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरले असताना त्यांच्या सल्लागाराच्या कंपनीवर झालेल्या कारवाईमुळे राजकारण अधिकच तापले आहे. आता ही चौकशी कोणत्या दिशेने जाते आणि पुढे काय उलगडते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

