कारची काच फोडून पोलिसांनी इम्रान खान यांच्या मित्राला घेतले ताब्यात

कारची काच फोडून पोलिसांनी इम्रान खान यांच्या मित्राला घेतले ताब्यात

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळच्या मित्र आणि चीफ ऑफ स्टाफ शाहबाज गिल यांना मंगळवारी अटक करण्यात आली. इम्रान खान यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना लष्कराशी भिडणे कठीण जाणार आहे. खान यांच्या जवळच्या मित्र आणि चीफ ऑफ स्टाफ शाहबाज गिल यांनी सोमवारी एका टीव्ही कार्यक्रमात सेनेला देशद्रोही म्हटले होते. याप्रकरणी गिल यांना मंगळवारी अटक करण्यात आली.

शाहबाज गिल एका आलिशान कारमधून इम्रान खान यांचे निवासस्थान बनीगाला येथे जात होते. यावेळी पोलिसांनी त्यांची अडवली. त्यांनी कारचा दरवाजा न उघडल्याने पोलिसांनी रायफलने काच फोडली आणि नंतर खिडकीतून लॉक उघडून गिल यांना बाहेर काढले. यानंतर इम्रान खान यांनाही कधीही अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शाहबाज गिल हा केवळ इम्रानचा चीफ ऑफ स्टाफ नाही तर जवळचा मित्र आणि मार्गदर्शक देखील आहे. पाकिस्तानशिवाय त्याच्याकडे अमेरिकन नागरिकत्वही आहे. वादग्रस्त वक्तव्यांप्रकरणी गिल नेहमीच चर्चेत असतात. काहीच दिवसांपुर्वी शाहबाज गिल यांनी पाकिस्तानी लष्कर आणि न्यायव्यवस्थेबद्दल विधान केले होते. इम्रान खान यांना पदावरुन हटविणारे देशद्रोही आहेत. खान यांना लष्करप्रमुख बाजवा यांच्या आदेशावरुन हटविण्यात आले होते, असा आरोप शाहबाज गिल यांनी केला होता.

या विधानावर लष्कर आणि सरकार नाराज झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर गिल यांची गुप्तचर यंत्रणेकडून कडक चौकशी करतील, असे मानले जात आहे. यादरम्यान शाहबाज गिल इम्रान खान यांच्यासंबंधित अनेक गुपिते उघड करू शकतात.

याशिवाय इम्रान खान यांचा समर्थक पत्रकार इम्रान रियाझ खान यालाही अटक करण्यात आली आहे. ते एआरवाय (ARY) वृत्तवाहिनीशी संबंधित होते. यासोबतच इस्लामाबाद, कराची, लाहोर आणि फैसलाबादसह अन्य शहरांमध्ये एआरवाय वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण बंद करण्यात आले आहे. हे पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या वृत्तवाहिनींपैकी एक आहे.

दरम्यान, आपल्या साथीदारांच्या अटकेचा निषेध करत माजी पंतप्रधान इम्रान यांनी लोकशाहीत असे लज्जास्पद कृत्य घडू शकते का? हे अपहरण आहे, अटक नाही. राजकीय कार्यकर्त्यांना शत्रूसारखी वागणूक दिली जात आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com