Crime : पोलिसच निघाला चोरांच्या टोळीचा म्होरक्या; पोलिसांनी सापळा रचून केलं अटक
समाजात कायदा-सुव्यवस्थेचा रक्षक मानला जाणारा पोलीस अधिकारीच चोरांचा म्होरक्या असल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यात उघडकीस आला आहे. बसस्थानकांवर नागरिकांच्या सोनसाखळ्या व रोकड चोरणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करताना पोलिसांनी निवृत्तीस काही महिने शिल्लक असलेल्या उपनिरीक्षकासह चार जणांना अटक केली आहे.
पीएसआय प्रल्हाद मान्टे होता मुख्य सूत्रधार
जालना येथील ५७ वर्षीय पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मान्टे हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले असून, तो थेट बसस्थानकांवर स्वतः हजर राहून चोरीत सहभाग घेत होता. १६ एप्रिल रोजी चोपडा बसस्थानकावर झालेल्या चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी सखोल तपास करून या गुन्ह्याचा छडा लावला. चोरीस गेलेल्या शेतकरी वसंत कोळी यांचे ३५ हजार रुपये व सोनसाखळीचा तपास करताना, चोपडा पोलिसांनी धरणगाव रस्त्यावर पाठलाग करून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एक चारचाकी वाहन (MH-43-N-2928) व चोरीची रक्कम हस्तगत करण्यात आली.
टोळीतील अन्य आरोपी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी
या टोळीत प्रल्हाद मान्टे याच्यासह श्रीकांत बघे, अंबादास साळगावकर आणि रऊफ शेख यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, अंबादास साळगावकर याच्यावर आधीच २७ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. यावरून या टोळीची गुन्हेगारी पार्श्वभूमी स्पष्ट होते.
पोलिसांची सतर्कता आणि कारवाई
चोरट्यांच्या टोळीचा तपास करताना पोलिसांनी बसस्थानक परिसरात गुप्त पाळत ठेवली होती. आरोपी चोरी करून परत जात असतानाच पोलिसांनी शिताफीने त्यांचा पाठलाग करत त्यांना अटक केली.