Pratap Sarnaik : मीरा-भाईंदरमधील जमिनीच्या व्यवहारावरून राजकीय वाद…,मंत्री सरनाईकांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप करत, “सरनाईकांनी मीरा-भाईंदरमधील २०० कोटींची जागा फक्त ३ कोटी रुपयांत लाटली,” असा दावा केला आहे. या आरोपानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
या आरोपांवर प्रताप सरनाईक यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “नेमकी ही जागा कोणती आहे आणि कुठे आहे, याबाबत वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करावे. बेछूट आरोप करून लोकांची दिशाभूल करू नये. जर माझ्यावर आरोप करायचे असतील, तर ठोस पुरावे सादर करावेत,” असा इशारा सरनाईक यांनी दिला आहे.
सरनाईक पुढे म्हणाले, “मी पारदर्शक पद्धतीने काम करतो. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही. अशा प्रकारचे खोटे आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत.”
विजय वडेट्टीवार यांनी लवकरच पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती देणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, या आरोप-प्रत्यारोपामुळे मीरा-भाईंदरचे राजकारण चांगलेच तापले आहे.
