Air pollution : मुंबईत थंडीबरोबर प्रदूषणाचा कहर, महापालिकेची 28 उपायांची नवी नियमावली
मुंबईत वाढत्या थंडीबरोबरच हवाप्रदूषणातही झपाट्याने वाढ होत असल्याने महापालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी 28 उपायांची नवी नियमावली जाहीर केली आहे. हे नियम पाळले नाहीत तर संबंधित बांधकामे आणि प्रकल्पांवर कामबंदीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकामस्थळी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 200 च्या वर गेल्यास ताबडतोब काम थांबवले जाईल. त्यासाठी शहरातील 24 ही वॉर्डमध्ये विशेष उड्डाण पथके नियुक्त करण्यात आले आहेत.
मुंबईत सध्या सुमारे 6,000 पेक्षा जास्त बांधकाम प्रकल्प सुरू असून त्यातून निर्माण होणारी धूळ प्रदूषण वाढीची मोठी कारणे असल्याचे आढळले आहे. त्यामुळे या प्रकल्पांसाठी कठोर नियम लागू केले गेले आहेत. वॉर्ड पातळीवर तपासणी, नोटीस, कामबंदी आणि आवश्यक असल्यास प्रकल्प सील करण्याचीही तयारी ठेवली आहे.
निर्देशांक 200 पेक्षा सतत जास्त राहिल्यास प्रकल्पांना GRAP-4 नियमांतर्गत पूर्ण बंदी लागू होऊ शकते. या सर्व नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिकेच्या उपायुक्त आणि सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत.
मुंबईतील वायूप्रदूषण रोखण्यासाठी लागू केलेले नियम न पाळल्यामुळे वरळी परिसरातील चार बांधकाम प्रकल्पांवर महापालिकेने कामबंदीची नोटीस दिली आहे. हवाप्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेने अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना जाहीर केल्या असून बांधकामांमधून होणाऱ्या धूलिकणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी २८ मुद्द्यांची सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे विकासकांना देण्यात आली आहेत.
मात्र, वरळीतील काही विकासकांनी हे नियम न पाळल्याचे आढळल्याने त्यांना त्वरित काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. **कामे बंद न केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पालिकेने दिला आहे. या नियमांचे पालन होते की नाही हे तपासण्यासाठी महापालिकेने विशेष भरारी पथके ही तैनात केली आहेत.

