मुंबईत पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती, भरधाव वेगात ५ दुचाकींना धडक
पुण्यातील पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती मुंबई नगरीत पाहायला मिळाली आहे. १९ वर्षीय अल्पवयीन तरुणाने बेदरकारपणे पोर्शे कार चालवत पाच दुचाकींना धडक दिली आहे. वांद्रे पश्चिमेतील साधू वासवानी चौकात ही घटना घडली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
भरधाव कार थेट पार्किंग लॉटमध्ये दामटवत त्याने तेथील दुचाकींना धडक दिली, सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. कारचालक तरुण हा बड्या व्यासायिकाचा मुलगा आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कारचालक ध्रुव गुप्ता याचे म्हणणे आहे की, कारचे स्टेअरिंग जाम झाले होते. ज्यामुळे दुचाकींला धडक लागली. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. ध्रुव हा सध्या विद्यार्थी असून तो विलेपार्ले येथील रहिवाशी आहे.
वांद्रे पश्चिमेतील साधू वासवानी चौकातील हा थरार सिटिम्सही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भरधाव वेगात असणाऱ्या पोर्शे कारने दुचाकींना धडक दिली. व्हिडीओमध्ये दित असल्याप्रमाणे कारने धडक दिल्यानंतर गाडीतील पाचही जण गाडीतून उतरताना दिसत आहेत. ते मद्यधुंद असल्याचेही दिसतेय. अपघातस्थळी लोक जमा होऊ लागताच त्यातील एक तरुणी पुन्हा गाडीत बसताना दिसतेय. एवढ्यात एक काचेची बाटली बाहेर फेकताना देखील सीसीटीव्हीमध्ये दिसतेय. बॉटल नेमरी कसली? यावर शंका उपस्थित होत आहे.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. आम्ही तरुणाविरुद्ध रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर त्याला नोटीसही बजावली आहे.' तर ध्रुव गुप्ता याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या अहवालात नेमकं काय समोर येतं हे पाहणेही महत्वाचे असणार आहे.