Sandeep Deshpande : मनसेत खळबळ! राज ठाकरेंचा निकटवर्तीय नेता पक्ष सोडणार? राजकारणात मोठी उलथापालथ
राज्यात महापालिका निवडणुकांचा जोर वाढला असून २९ शहरांमध्ये मतदान होणार आहे. मात्र सर्वाधिक लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. यंदाची मुंबईची लढत अत्यंत महत्त्वाची मानली जात असून राजकीय समीकरणेही पूर्णपणे बदललेली दिसत आहेत.
पहिल्यांदाच शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्र आल्या आहेत. तब्बल वीस वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) देखील सहभागी झाल्याने महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाची युती तसेच काँग्रेस-वंचित आघाडीही मैदानात आहे.
या सगळ्या घडामोडींमध्ये मनसेला मात्र अंतर्गत अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील मनसेचा जिल्हा प्रमुख पक्ष सोडून गेल्यानंतर आता आणखी एक धक्का बसण्याची चर्चा आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
जागावाटपाबाबत योग्य संवाद न झाल्याने ते अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहे. महापालिका निवडणूक संपल्यानंतर ते पक्षातून बाहेर पडू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. एकूणच मुंबईची निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही, तर पक्षांची ताकद दाखवणारी ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

