Mahavitaran : वीज दरवाढीचा यंत्रमाग उद्योजकांना फटका; अनेक उद्योग बंद पडण्याच्या उंबरठ्यावर
Mahavitaran : महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नव्या ‘मल्टी-इयर टॅरिफ ऑर्डर’नुसार राज्यातील औद्योगिक वीज दरात लक्षणीय वाढ होणार आहे. परिणामी उच्चदाब आणि लघुदाब वीज वापरणाऱ्या उद्योजकांपुढे अडचणींचं सावट निर्माण झालं आहे. नव्या दररचनेनुसार प्रति युनिट वीज दरात 1 ते 1.30 रुपयांची वाढ होणार आहे, जी अनेक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणणारी ठरू शकते. या दरवाढीचा सर्वाधिक फटका राज्यातील यंत्रमाग उद्योगांना बसणार असल्याचे वीज ग्राहक संघटनांनी स्पष्ट केले आहे. विशेषतः इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव, सांगली, वसई, ठाणे, पालघर, सोलापूर यांसारख्या भागांतील यंत्रमाग केंद्रित उद्योगधंदे तात्काळ या निर्णयाच्या परिणामाचा सामना करणार आहेत.
उद्योजकांनी सरकारच्या ‘आत्मनिर्भर उद्योग’ धोरणाचा स्वीकार करत सौरऊर्जा प्रणाली बसवून स्वतंत्र वीज निर्मितीकडे पावले उचलली होती. मात्र, वाढलेल्या दरामुळे हे उद्योगही अडचणीत सापडणार आहेत. वाढीव दरामुळे सौर ऊर्जेच्या वापरावरही अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे, असं मत अनेक उद्योजकांनी व्यक्त केलं आहे. नवीन दररचनेत मागणी शुल्क, ऊर्जा शुल्क, वहन आकारणी, वेळेनुसार दर, युनिट व केव्हीएएच आधारीत बिलिंग, तसेच पॉवर फॅक्टरशी संबंधित प्रोत्साहन अशा विविध मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे सचिव जाविद मोमीन यांनी सांगितले की, नव्या दरवाढीमुळे सध्या चालू असलेल्या यंत्रमाग उद्योगांचे गणितच कोलमडण्याची शक्यता आहे. वाढत्या खर्चामुळे अनेक उद्योग बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे, जो राज्याच्या आर्थिक घडीसाठीही धोकादायक ठरू शकतो. सध्या उद्योगांनी सरकारकडे या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली असून, लघु व मध्यम उद्योगांना काही सवलती मिळाव्यात अशी मागणीही जोर धरत आहे.