Pradeep Purohit : "मोदी गेल्या जन्मीचे छत्रपती शिवाजी महाराज", भाजपाच्या खासदाराचं वादग्रस्त विधान
सध्या राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा जोर धरुन आहे. या वादामुळे काल नागपुर येथे दोन गटात दंगल पेटलेली पाहायला मिळाली. तसेच ही दंगल एवढी तीव्र होती की, दोन्ही गटाकडून दगडफेक तसेच गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. हा सुरु असताना आता ओडिशातील बारगढ येथील भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केली आहे.
भाजप खासदार प्रदीप पुरोहित नेमकं काय म्हणाले?
ओडिशातील बारगडचे भाजपा खासदार प्रदीप पुरोहित यांनी बजेट सत्रात पंतप्रधान मोदी हे गेल्या जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते, असं विधान करुन चांगलाच दिवा लावला आहे. त्यासाठी त्यांनी ओडिशातील गिरीजाबाबा या संतानी त्यांनी ही गोष्ट सांगितल्याचा दावा केला आहे. यावेळी ते म्हणाले की, मला एका साधूने सांगितले होते की, पंतप्रधान मोदी हे त्यांच्या मागील जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यामुळे ते संपूर्ण देशाला विकास आणि प्रगतीकडे नेण्यासाठी काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या जन्मात छत्रपती शिवराय असल्याचा दावा केल्यामुळे संसदेत बोलताना त्यांनी सर्व मर्यादा सोडल्या आहे.
मात्र, आता पुरोहित यांच्या या विधानामुळे संपुर्ण राजकारण तापलेलं आहे. त्यामुळे ठाकरे गटासह, काँग्रेस आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी विरोध केला. तसेच सभापती दिलीप सैकिया यांनी प्रदीप पुरोहित यांच्या वक्तव्यांची पडताळणी करून त्यांना सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांना सभागृहाच्या कामकाजातून ते काढून टाकण्याचा विचार करावा, अशी विनंती केली. तसेच भाजप खासदाराच्या या विधानामुळे विरोधकांसह शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.