Prakash Mahajan On Pramod Mahajan Death : प्रमोद महाजनांचा खून लोभ आणि मत्सरातून! प्रकाश महाजनांचा गौप्यस्फोट; मुंडेंच्या खऱ्या वारसदाराविषयी सनसनाटी दावा
महाराष्ट्रातील भाजपच्या दोन मोठ्या घराण्यांमध्ये पुन्हा एकदा वाद पेटला आहे. गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारस कोण, या चर्चेला आता नवा मोड मिळाला आहे. माजी केंद्रीय मंत्री स्व. प्रमोद महाजन यांच्यविषयी प्रकाश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे खळबळ माजली आहे.
प्रकाश महाजन यांच्या मते, प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांची हत्या ही मत्सर आणि पैशांच्या वादातून केली. त्यांनी असा दावा केला की, प्रवीण हे पैशांसाठी भावाला दबावत ठेवत होते. या प्रकरणात एका व्यक्तीची भूमिका असल्याचेही ते म्हणाले, मात्र कायदेशीर कारणामुळे त्याचे नाव उघड करण्यास नकार दिला.
यापूर्वी सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे यांच्यावर ‘बिघडलेली मुलगी’ असा उल्लेख करत टीका केली होती. त्यावरून प्रकाश महाजन यांनी सारंगी महाजन यांच्यावर तीव्र शब्दांत प्रत्युत्तर देत, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर अनेक संकटे आली असून त्याची जाणीव ठेवण्याचा सल्ला दिला.
प्रकाश महाजन यांनी असा आरोपही केला की, गोपीनाथ मुंडे यांच्या विश्वासावर घेतलेल्या जमिनीच्या वादातून पंकजा मुंडे यांना लक्ष्य केले जात आहे. नावात ‘महाजन’ असल्याचा आधार घेत काही लोक आरोप करीत आहेत, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, “जेव्हा सोय झाली, तेव्हा महाजन आणि मुंडे नावाची मदत घेतली; आणि आज त्यांच्याच कुटुंबावर बोट ठेवले जात आहे, हे योग्य नाही.” तसेच, परळीतील लोकांनाच विचारले तर कोण चुकीच्या मार्गावर आहे हे समोर येईल, असा त्यांचा दावा.
सारंगी महाजन यांनी पूर्वी विविध व्यक्तींवर केलेल्या आरोपांचाही उल्लेख करत प्रकाश महाजन यांनी टीका चालू ठेवली. “इतरांच्या व्यक्तिगत आयुष्यावर घाव घालण्यापेक्षा स्वतःच्या घरातील सत्याकडेही नजर टाका,” असा टोला त्यांनी लगावला.
एकूणच, महाजन आणि मुंडे घराण्यांमधील जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून, आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा वाद कसा वळण घेईल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

