प्रणिती शिंदे यांचं निवडणूक आयोगाला पत्र; पत्रात काय?

प्रणिती शिंदे यांचं निवडणूक आयोगाला पत्र; पत्रात काय?

आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. या पत्रात प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे की, मार्च महिना उजाडला की आपले सोलापूर शहर असो वा ग्रामीण भाग, जनता पाणी टंचाईने त्रस्त होऊन जाते. यंदाच्या वर्षी तर सोलापूर परिसरात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी माता-भगिनींना पायपीट करावी लागत आहे. शेती दूरचीच गोष्ट, पण जनावरांसाठी पाणी मिळणेही मुष्किल झाले आहे. त्याबाबतीत त्वरित हालचाल करणे आवश्यक आहे.

पाणी टंचाईच्या काळात अनेक सेवाभावी संस्था, राजकीय पक्ष, समाजातील दानशूर व्यक्ती ग्रामीण भागात पिण्याचे पाणी पुरवण्याची सोय करत असतात. शासकीय स्तरावरही काही प्रमाणात पाण्याची सोय केली जाते. मात्र आत्ता निवडणुका जाहीर झाल्याने व आचारसंहिता सुरु असल्याने अनेकांना पाणी पुरवठा करण्याच्या या समाज उपयोगी कामात अडथळे येण्याची शक्यता आहे, त्यांना अडवले जाण्याची, कारवाई होण्याचीही शक्यता आहे. पण त्यामुळे ग्रामीण जनतेला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागेल. पाण्याअभावी जनावरांचे हाल होतील. तरी जर आपण लोकांची अडचण आणि गंभीर झालेला पाणी प्रश्न याची दखल घेतलीत व त्या बाबतीत सहकार्य केलेत, तर सोलापूरच्या पाणी प्रश्नाची धग कमी होण्यास मदत होऊ शकेल.

शासनाकडून पाण्याची सोय झाली तर उत्तमच, पण त्याच सोबत सामाजिक संस्थांकडून ग्रामीण भागात पाणी पोहोचवताना आपले सहकार्य आणि परवानगी असणे आवश्यक ठरेल. निवडणूक आचारसंहितेचा भंग न करता, कुठलाही इतर राजकीय स्वार्थ न पाहता हे कार्य करण्याची जर मुभा मिळाली तर माझ्या सोलापूरच्या लोकांसाठी काम करत राहणे शक्य होईल. तुम्ही माझ्या विनंतीचा विचार कराल आणि पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मदत कराल अशी आशा आहे. या तीव्र उन्हाळ्यात आपण सर्वांनी मिळून सोलापूरकरांच्या पाण्याची काळजी घ्यावी, ही आग्रही विनंती. असे प्रणिती शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com