Pravin Tarde On Vaishnavi Case : 'हुंड्याच्या पैशांमधून उभारलेली घरंदारं, प्राॅपर्ट्या पेटवून द्या..'; प्रवीण तरडे यांनी सुनावलं
राज्यात सध्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसोबतच सिनेक्षेत्रातील कलाकारही आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेनंतर आता लेखक-दिग्दर्शक-अभिनेता प्रवीण तरडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून या प्रकरणी तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. "हुंड्याच्या पैशांमधून उभारलेली घरंदारं, प्राॅपर्ट्या पेटवून द्या.. कुणा बहिणीचा असा छळ चालू असेल तर पुढे येऊन बोला..समाज म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत..", या शब्दांत प्रवीण तरडे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र दुःख व्यक्त करत आहे. पुणे पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुळशी तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. हुंड्याच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. हुंड्याच्या मागणीसाठी वैष्णवीचे सासरच्या लोकांनी तिच्या प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ केला, असा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. या प्रकरणी वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे.