किल्ले रायगडावर शौर्य अभिमान दिवस साजरा

किल्ले रायगडावर शौर्य अभिमान दिवस साजरा

बर्गे कुटुंबियांच्या वतीने किल्ले रायगडावर शौर्य, अभिमान दिवस साजरा करण्यात आला.

प्रशांत जगताप|सातारा: स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे १८ मार्च १७७३ रोजी तिसऱ्या वेळी स्वराज्यात आणण्याच्या मोहिमेत कोरेगावचे समशेरबहाद्दर खंडेराव बर्गे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावलेल्याला आज अडीचशे वर्षे पूर्ण होत असल्यामुळे बर्गे कुटुंबियांच्या वतीने किल्ले रायगडावर शौर्य, अभिमान दिवस साजरा करण्यात आला असल्याची माहिती कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी दिलीये.

चंद्रराव मोरे यांच्याकडून मे १६५६ मध्ये किल्ले रायगड हा शिवाजीराजे यांच्या ताब्यात आला. छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदानानंतर तीन नोव्हेंबर १६८९ मध्ये हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या आदेशाने हा किल्ला पाच जून १७३३ मध्ये पुन्हा स्वराज्यात सामील झाला. त्यांच्या मृत्यूनंतर किल्ले रायगडचा हवालदार पोतनीस मराठ्यांच्या विरुध्द उठला, तेव्हा शाहू महाराजांचे वारसदार रामराजा यांनी ३० ऑगस्ट १७७२ मध्ये रायगड पेशव्यांच्या ताब्यात देण्याची आज्ञा केली. मात्र त्याने आज्ञा पाळली नाही. त्यानंतर थोरले माधवराव पेशव्यांनी रायगड पुन्हा ताब्यामध्ये घेण्यासाठी सुरू केलेली मोहीम नारायणराव पेशवे यांनी सरदार आप्पाजी हरी यांचे नेतृत्वात १८ मार्च १७७३ मध्ये पूर्ण केली आणि रायगड तिसऱ्या वेळी स्वराज्यात आला. त्यानंतर आप्पाजी हरींनी तेथेच दरबार भरवला आणि रायगडाची पुढील संपूर्ण व्यवस्था लावून दिली. सर्व सरदारांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. या ऐतिहासिक मोहिमेचे आणि ऐतिहासिक अशा दिवसाचे साक्षीदार खंडेराव बर्गे हे एक होत. ही घटना बर्गे घराण्यासाठी सन्मानाची आणि अभिमानास्पद गोष्ट असल्याचे राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले.

रायगड स्वराज्यामध्ये तिसऱ्या वेळी आणण्यात खंडेराव बर्गे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इतर सरदारांसह मोलाची कामगिरी बजावल्याच्या पार्श्‍वभूमीवर बर्गे घराण्याने यंदापासून १८ मार्च हा दिवस रायगडावर "समशेरबहाद्दर खंडेराव बर्गे पराक्रम, शौर्य आणि अभिमान दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने दरवर्षी या दिवशी बर्गे घराण्यातील लहान थोर मंडळी स्वयंस्फूर्तीने रायगडावर जाऊन तेथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दर्शन, किल्ले रायगड पूजन, छत्रपती शिवाजी महाराज, खंडेराव बर्गे यांच्या शौर्याचे स्मरण करून त्यांच्या शौर्याची परंपरा आपापल्या क्षेत्रात प्रत्यक्षात आणण्याची शपथ घेतील असे राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले.किल्ले रायगडावर शौर्य अभिमान दिवस साजरा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com