PM Narendra Modi : RSSच्या शताब्दीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
थोडक्यात
RSS च्या शताब्दीवर नरेंद्र मोदींचा विशेष लेख
100 वर्षांपूर्वी विजयादशमीच्या दिवशी संघाची स्थापना झाली
नैसर्गिक संकटात स्वयंसेवक सर्वात समोर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. संघाच्या शताब्दीवर त्यांनी एक खास लेख सुद्धा लिहिला. 100 वर्षांपूर्वी विजयादशमीच्या मोठ्या उत्सावाच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. ही हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेचा जीर्णोद्धार आहे. राष्ट्रीय चेतना या माध्यमातून वेळोवेळी नवीन अवतरांमध्ये प्रत्येक युगातील आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रकट होते. संघ हा शाश्वत राष्ट्रीय चेतनेचा सद्गुणी अवतार असल्याचे मत त्यांनी मांडले. राष्ट्र निर्मिती, व्यक्ती निर्माण आणि राष्ट्र प्रथम या संघाच्या मूलमंत्राचा उल्लेख करत त्यांनी कौतुक केले. संघाचे शताब्दी वर्ष पाहण्याचे सौभाग्य आमच्या पिढीतील स्वयंसेवकांना लाभले आहे.
या सुदिनी राष्ट्र सेवेच्या या यज्ञात समर्पित होणाऱ्या कोटी कोटी स्वयंसेवकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांनी संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांना नमन केले. 100 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचे संघाच्या स्मरण करण्यासाठी विशेष टपाल तिकिटे आणि स्मारक नाणी काढल्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला.
राष्ट्र प्रथम हाच संघटनेचा उद्देश
मोठमोठ्या नद्यांच्या काठांवर मानवी संस्कृतींचा विकास होतो. त्याचप्रमाणे संघाच्या तिरावर अनेकांचे जीवन फुलले आहे. एक नदी ज्या भागातून वाहते. ती तो भाग आपल्या पाण्याने सिंचित करून समृद्ध करते. संघाने तसा प्रत्येक क्षेत्र, समाजाला स्पर्श केला आहे. अनेक प्रवाहातून नदी प्रकट होते. संघाची यात्रा पण अशीच आहे. संघाच्या विविध संघटना मानवी जीवनाशी निगडीत प्रत्येक घटकाची आणि राष्ट्राची सेवा करतात. शिक्षण, कृषी, समाज कल्याण, आदिवासी कल्याण, महिला सबलीकरण, समाज जीवन अशा अनेक क्षेत्रात संघाचे निरंतर कार्य सुरू आहे. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या या संघटनांचा उद्देश एकच आहे, त्यांचा भाव आणि भावना एकच आहे, तो म्हणजे राष्ट्र प्रथम, देश अगोदर.
ही संघटना आकाराला येतानाच राष्ट्र निर्मितीचा विराट उद्देश यामध्ये होता. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी संघाने व्यक्तिमत्व निर्मितीतून राष्ट्र निर्मितीचा रस्ता निवडला. त्यासाठी नियमीत शाखा, वर्ग घेण्याची कार्य पद्धती निवडली. संघाची शाखा जिथे भरते ते मैदान एक प्रेरणा भूमी आहे. याच मैदानावर स्वयंसेवकाचा अहंकारापासून स्वतःकडील प्रवास सुरू होतो. संघाच्या विकासाच्या वेदी आहेत.
नैसर्गिक संकटात स्वयंसेवक सर्वात समोर
संघाच्या स्थापनेपासूनच देशभक्ती आणि सेवा हे समानार्थी शब्द ठरले आहेत. फाळणीच्या वेदनेमुळे लाखो कुटुंबं बेघर झाली. तेव्हा स्वयंसेवकांनी निर्वासितांची सेवा केली. प्रत्येक आपत्तीमध्ये, संघाचे स्वयंसेवक त्यांच्या मर्यादीत साधनसंपत्तीसह आघाडीवर होते. हे केवळ मदतकार्य नव्हते तर राष्ट्राला बळकटी देण्याचे काम होते. वैयक्तिक त्रास झाला तरी इतरांचे दुःख कमी करणे हे प्रत्येक स्वयंसेवकांचे वैशिष्ट्ये आहे. नैसर्गिक संकटात स्वयंसेवक सर्वात अगोदर पोहचतात असे मत त्यांनी व्यक्त केले.
आता पुढील शताब्दी वर्षाच्या यात्रेवर संघ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वबोधाची भावना, जाणीव ही गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त करते असे म्हटले. आपल्या परंपरा आणि वारशावर आपल्याला अभिमान असावा आणि स्वदेशीची मूळ संकल्पना पुढे न्यावी असं ते म्हणाले. सामाजिक समरसतेला घुसखोरांमुळे मोठे आव्हान उभं ठाकलं आहे. अनेक प्रदेशात सामाजिक विषमतेवर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की याविरोधात आपल्याला डेमोग्राफी मिशन हाती घ्यावे लागेल. पुढील 100 वर्षांच्या वाटचालीवर अजून अनेक संकल्पनेसह संघ आता निघाल्याचे ते म्हणाले. 2047 मध्ये विकसीत भारतात संघाचे मोठे योगदान असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.