PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला भेट देण्याची शक्यता
थोडक्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात मणिपूरला भेट देण्याची शक्यता
विरोधकांनी मणिपूरमधील हिंसाचार आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर सातत्याने हल्लाबोल केला होता
या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
(PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात मणिपूरला भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिंसाचार उसळल्यानंतर मोदींची ही पहिलीच भेट ठरण्याची शक्यता असल्याने या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. विरोधकांनी मणिपूरमधील हिंसाचार आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर सातत्याने हल्लाबोल केला होता. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला भेट देण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, दीर्घ चर्चेनंतर कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन (केएनओ) आणि युनायटेड पीपल्स फ्रंट (यूपीएफ) या दोन प्रमुख संघटनांनी सरकारसोबत एसओओ करार केला आहे. मणिपूरचे भौगोलिक ऐक्य कायम राखणे आणि लोकशाही चौकटीत राहून प्रश्न सोडवणे हा या कराराचा गाभा आहे. कुकी-झो परिषद या संघटनेने दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग खुला करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होणार आहे.
हा एसओओ करार प्रथम २००८ मध्ये झाला होता. मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासून कुकी आणि मैतेयी समाजातील संघर्ष उफाळून आला. मैतेयी समाजाने अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी केल्याने डोंगराळ भागातील कुकी समाजाने तीव्र विरोध केला. परिणामी उसळलेल्या हिंसेत आतापर्यंत 260 जणांचा बळी गेला. शेकडो कुटुंबे बेघर झाली. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मणिपूर दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.