PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्याच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्याच्या दौऱ्यावर येत आहेत. विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या उपस्थित विदर्भातील प्रचाराचा नारळ फुटणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत 'राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा योजने'चा वर्षपूर्ती सोहळा होणार आहे.
यासोबतच पीएम विश्वकर्मा योजनेच्या यशोगाथेला समर्पित एका 'स्मृती टपाल तिकिटा'चं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे. पंतप्रधान पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज वितरित करतील.
या कार्यक्रमासाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.
यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये येणार असून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरात नो ड्रोन झोन घोषित करण्यात आले आहे.आज शहरात कोणत्याही भागात कोणत्याही स्थितीत ड्रोन उडवता येणार नाही. कुणी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेश पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली आहे.