Janasuraksha Bill : विरोधकांच्या सभात्यागानंतरही विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर
महाराष्ट्र विधान परिषदेच्या अधिवेशनात आज (11 जुलै) मोठा गोंधळ आणि नाट्यमय घडामोडींमध्ये जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आले. विधानसभेत एकमताने मंजूर झाल्यानंतर विधान परिषदेत हे विधेयक सादर करण्यात आले असताना, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतल सभात्याग केला. विरोधकांच्या अनुपस्थितीतच विधेयक मंजूर करण्यात आले.
नक्षल विचारसरणीविरोधात जनसुरक्षा विधेयक
राज्यातील तरुण पिढी राष्ट्रविघातक डाव्या विचारांनी प्रभावित होऊन नक्षलवादाच्या मार्गाकडे वळण्याचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने हे जनसुरक्षा विधेयक आणले आहे. संविधानाला झुगारणाऱ्या घातक विचारांना पायबंद घालणे. तसेच राज्यातील शांती-सुव्यवस्था अबाधित राखणे, हा या विधेयकाचा मुख्य उद्देश असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.
गुरुवारी (10 जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले होते. संयुक्त चिकित्सा समितीच्या शिफारशींचा आधार घेत विधेयकाचे महत्त्व स्पष्ट करत, ते एकमताने मंजूर झाले होते.
विधान परिषदेत गोंधळ
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज हे विधेयक विधान परिषदेत मांडले. चर्चेदरम्यान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी "एक विशिष्ट विचारसरणी संपवून शिवसेना स्थापन केली", असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानावर शिवसेना (ठाकरे गट) आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला की, "ठाकरे साहेबांनी कोणती विचारसरणी संपवली? आणि सरकार नक्षलांविरोधात बोलत आहे की, इतर कोणत्या विचारांविरोधात?", त्यांनी स्पष्ट सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा गैरवापर करून वेगळा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न होत आहे.
सभागृहात गोंधळ आणि सभात्याग
प्रसाद लाड आणि अंबादास दानवे यांच्यात झालेल्या शाब्दिक वादानंतर सभागृहात गोंधळ निर्माण झाला. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दोन्ही बाजूंना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र गोंधळ शमला नाही. त्यानंतर अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सभात्याग केला.
सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी स्थगित केल्यानंतर पुन्हा सुरु झाले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधेयक मंजूर करण्याची मागणी केली आणि विरोधक अनुपस्थित असतानाच सभापती राम शिंदे यांनी जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेत मंजूर झाल्याचे जाहीर केले.
विरोधकांचा आरोप
दुसरीकडे, विरोधकांनी सरकारवर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा राजकीय हेतूने गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, नक्षलविरोधी विधेयकावर चर्चा करताना शिवसेना प्रमुखांच्या विचारसरणीचा संदर्भ देणे चुकीचे आहे आणि त्यामुळे विधान परिषदेतील वातावरण गढूळ झाले.