Pune : अजित पवारांचा हिंजवडी दौरा; वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

Pune : अजित पवारांचा हिंजवडी दौरा; वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

हिंजवडीतील विकास कामांचा आढावा; वाहतूक कोंडीवर अजित पवारांचे निर्देश
Published on

आयटी उद्योगांचे केंद्र मानल्या जाणाऱ्या हिंजवडीमध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या रस्त्यांची पाहणी केली आणि काही ठिकाणी थेट कारवाईचे आदेश दिले.

विप्रो कंपनीच्या शेजारी असलेल्या एका रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरोधात कडक शब्दांत कारवाईचे निर्देश देत, "सरकारी कामात अडथळा आणल्यास भारतीय दंड विधानाच्या कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करा," असे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले. तसेच, जागा ज्यांची आहे, त्यांना योग्य मोबदला देण्यात येईल, हेही त्यांनी स्पष्ट केले.

या दौऱ्यात अजित पवारांनी हिंजवडीतील पीएमआरडीए व मेट्रो प्रकल्पांची कामगिरी आणि नियोजनाची झलकही घेतली. क्रोमा चौकात मेट्रो स्टेशनच्या सरकत्या जिन्याची रचना चुकीची असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

स्थानिक आयटी कर्मचारी आणि रहिवाशांनीही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वाहतूक समस्यांकडे लक्ष वेधले. "पूर्वीचा रस्ता प्रशस्त होता, पण मेट्रोच्या बांधकामामुळे तो अरुंद झाला आहे, त्यामुळे रोजच मोठी वाहतूक कोंडी होते," अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर हिंजवडीतील वाहतूक समस्या मार्गी लागतील, अशी आशा तिथल्या आयटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com