Pune Police on Satish Wagh Murder : सतीश वाघ यांच्या हत्येचे सूत्रधार कोण? पुणे पोलिसांची धक्कादायक माहिती
पुण्यातील भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येचं गूढ उकललं आहे. सतीश वाघ यांचा खून वैयक्तिक कारणातून झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना मारण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
सतीश वाघ यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती, शेजारी राहणाऱ्या इसमाने सतीश वाघ यांच्या हत्येसाठी 5 लाख रुपयांची सुपारी दिली होती. अशी धक्कादायक माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वी भाडेकरू म्हणून राहणारा अक्षय जावळकर याचे व सतीश वाघ यांचे वैमनस्याचे संबंध होते व त्या दोघांमध्ये वितुष्ट होते. या कारणावरून अक्षय जवळकर याने मागील चार ते पाच महिन्यापूर्वी वाघ यांना ठार मारण्याची सुपारी पवन शर्मा याला दिलेली होती.
मागील चार ते पाच दिवसांपूर्वी पवन शर्मा याने त्यांचे साथीदार नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे आणि इतरांनी कट रचला. तसेच अक्षय जावळकर यांच्याकडून आगाऊ रक्कम देखील स्वीकारली. वाघ मॉर्निंग वॉकला गेले असताना ठरल्याप्रमाणे आरोपींनी आधी त्यांचे अपहरण केलं आणि त्यानंतर त्यांचा खून केला.
या प्रकरणातील 5 पैकी 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ज्या व्यक्तीने सतीश वाघ यांच्या खुनाची सुपारी दिली. त्याला देखील पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण घटनेबाबत सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिलं आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, “पुणे क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलिसांनी अतिशय युद्ध पातळीवर या गुन्ह्याचा तपास केला आहे. अजूनही तपास सुरु आहे. सुरुवातीला घटना घडल्यापासून वेगवेगळे पथक या प्रकरणात काम करत होते. पोलिसांनी तपासाच्या पहिल्याच दिवशी 450 ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. त्या आधारावर पोलिसांनी जलद गतीने तपास करत अपहरण करताना वापरलेली गाडी ताब्यात घेतली. त्यानंतर हळूहळू आरोपी पोलिसांच्या हाती लागले. पोलीस या प्रकरणी ठोस पुरावे गोळा करत आहेत. या प्रकरणात ज्या व्यक्तीने 5 लाखांची सुपारी दिली होती त्याची चौकशी सुरु आहे. आरोपीला कठोर शिक्षा होईल या दृष्टीने पोलीस अत्यंत मेहनतीने काम करत आहेत”, अशी प्रतिक्रिया पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
दरम्यान, सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. सोमवारी सकाळी पहाटे मॉर्निंग वॉकला गेल्यावर तिथूनच त्यांना गाडीत घालून हल्लेखोरांनी त्यांना संपवत मृतदेह शिंदवणे घाटामध्ये फेकला होता.