Punit Balan : गणेशोत्सवात डीजेमुक्त भूमिकेवरून ‘बँड कला विकास प्रतिष्ठान’च्या वतीने पुनीत बालन यांचा सत्कार
गणेशोत्सवात डीजे लावणाऱ्या मंडळांना मदत न करण्याचा निर्णय घेऊन विधायक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेतल्याबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांचा 'बँड कला विकास प्रतिष्ठान' पुणे यांच्याकडून सत्कार करण्यात आला. 'पुनीत बालन ग्रुप'चे अध्यक्ष पुनीत बालन दरवर्षी गणेशोत्सवात गणेश मंडळांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य करत असतात. याशिवाय ढोल ताशा पथकांनाही त्यांचे मोठे सहकार्य असते. गणेशोत्सवात प्रामुख्याने विसर्जन मिरवणुकीत डीजे लावण्यात असल्याने नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.
तसेच डिजे मुळे अनेकांना शारीरिक इजा झाल्याचेही प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर बालन यांनी यावर्षीचा गणेशोत्सव डीजेमुक्त करण्याचा संकल्प केला असून डीजे लावणाऱ्या गणेश मंडळाना जाहिरात प्रायोजकत्वाच्या माध्यमातून मदत न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या भूमिकेचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. बालन यांनी घेतलेल्या या विधायक भूमिकेचे 'बँड कला विकास प्रतिष्ठान' यांनीही स्वागत केले असून याबाबत त्यांनी पुनीत बालन यांचा सत्कार केला. यावेळी प्रतिष्ठानचे ओंकार आढाव, औदुंबर शिंदे, हेमंत माने, सुवन गवळी, बाळासाहेब आढाव हे पदाधिकारी उपस्थित होते.
"पुण्याच्या गणेशोत्सवाला एक वैभवशाली परंपरा आहे. या परंपरेला कुठंही गालबोट लागू नये उलट ती पुढील पिढीपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आज आपल्या सर्वांवरच आहे. त्याचाच भाग म्हणून डीजेचा वापर करणाऱ्या मंडळांना सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं सर्वच स्तरांतून स्वागत झालं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे मंडळांकडूनही सहकार्य मिळत असल्याने हा गणेशोत्सव अधिक उंचीवर घेऊन जाण्यास मोठी मदत होणार आहे".