Radhakrishna Vikhe-patil : राज्यातील महापालिका, नगरपालिकांनी नद्यांची वाट लावली; जलसंपदा मंत्र्यांनी फटकारले
राज्यातील महानगरपालिका, नगरपालिकांनी नद्यांची वाट लावली आहे, अशा शब्दात राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नदी काठच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना फटकारले आहे. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती यांचे सांडपाणी नदीमध्ये जात असल्याने नद्या प्रदूषित होत आहेत. यापुढे जलसंपदा विभागाच्या मार्फत सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींचे सांडपाणी एकत्रित करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. ते पाणी पुन्हा नदीत सोडले जाण्याबाबत विचार सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले.
शनिवारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पंढरपूर येथे २१ व्या जलसिंचन परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातील सर्व धरणांच्या पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. हे बाष्पीभवन रोखण्यासाठी धरणांवर सोलर पॅनल बसवले जाणार आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागाचे उत्पन्न देखील वाढणार आहे आणि पाण्याचे बाष्पीभवन कमी होणार आहे. तसेच राज्यामध्ये शेतीला पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याचा भोपाळ पॅटर्न राबवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे, अशी माहिती देखील विखे-पाटील यांनी दिली.