Rahul Gandhi on Election Commission : दिल्ली निवडणूक निकालाआधी राहुल गांधींना महाराष्ट्राच्या निकालांवर संशय, थेट निवडणूक आयोगाला जाब विचारला
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांच्याबरोबर खासदार सुप्रिया सुळे व खासदार संजय राऊतदेखील उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या घोटाळ्याबद्दल भाष्य केले आहे. त्यांनी निवडणूक आयोगावरदेखील अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच निवडणुकीवेळी अफरातफर झाल्याचा दावादेखील राहुल गांधी यांनी दाखल केला आहे.
पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी म्हणाले की, "आम्ही निवडणुकीबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. मतदार व मतदान सूचीचा आम्ही अभ्यास करत आहोत. या सगळ्याबद्दल चौकशी करत असताना आम्हाला यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. हातात आलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र विधानसभा 2019 व लोकसभा 2024 च्या दरम्यान 32 लाख मतदार जोडले गेले. तसेच लोकसभा 2024 आणि विधानसभा 2024 या पाच महिन्यात 39 लाख नवीन मतदार जोडले गेले. पण पाच महिन्यात पाच वर्षांपेक्षा अधिक मतदार कसे जोडले? हा प्रश्न आम्हाला पडला आहे".
पुढे ते म्हणाले की, "आम्ही निवडणूक आयोगावर आरोप करत नाही. पण आम्ही आरोप केले पाहिजेत. निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभेची मतदार यादी द्यावी. तसेच यामध्ये मतदारांचा नाव, पत्ता व फोटोदेखील असावा. आम्हाला हवी असलेली माहिती पुरवणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. त्यामुळे आम्हाला योग्य ती आणि आवश्यक अशी माहिती द्यावी अशी आमची इच्छा आहे".