Rahul Gandhi On PM Narendra Modi : राहुल गांधींची मोदींवर टीका ; "मोदी हे मोठं संकट नाही, ते एक 'शो' आहेत"
दिल्लीमध्ये झालेल्या 'OBC भागीदारी न्याय संमेलन' कार्यक्रमात काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करताना त्यांना "शो" असे संबोधले. मोदींना उगाचच फार मोठं केलं जात आहे, पण प्रत्यक्षात ते एवढे प्रभावी नेते नाहीत, असं मत त्यांनी मांडलं.
कार्यक्रमात उपस्थित श्रोत्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, "तुम्हाला वाटतं, नरेंद्र मोदी ही मोठी समस्या आहेत? नाही! ते मोठी अडचण नाहीत, ते एक शो आहेत. आणि हा शो इतका मोठा का वाटतो, हेही समजून घ्यायला हवं."
त्यांनी पुढे सांगितले की, "मी स्वतः पंतप्रधान मोदींना दोन-तीन वेळा भेटलो आहे, त्यांच्यासोबत एका खोलीत बसलो आहे. त्या अनुभवातून मला जाणवलं की ते काही फार मोठं संकट नाहीत. देशासमोरील खरी समस्या वेगळी आहे."
"OBC, SC, ST, आदिवासी आणि अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे"
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात देशातील सामाजिक न्यायाचाही मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितलं की, देशातील सुमारे ९० टक्के लोकसंख्या OBC, SC, ST, आदिवासी आणि अल्पसंख्याकांची आहे. पण दुर्दैवाने, या समूहांचे राजकीय आणि धोरणात्मक पातळीवर प्रतिनिधित्व कमी आहे.
"हीच उत्पादक आणि श्रमिक जनता आहे, पण त्यांना निर्णय प्रक्रियेत संधी दिली जात नाही," असं ते म्हणाले. यासोबतच राहुल गांधी यांनी 2014 पूर्वी काँग्रेस सरकारने जाती जनगणना न करण्याची चूक मान्य करत, ती सुधारण्याचा निर्धारही व्यक्त केला.
"देशाच्या संसाधनांवर लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क मिळायला हवा. जे जे निर्णय घेतले जातात, त्यामध्ये OBC, SC, ST समाजाच्या सहभागाशिवाय समतोल साधला जाऊ शकत नाही," असं त्यांनी ठामपणे सांगितलं.