विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र; पत्रात काय?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र; पत्रात काय?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून राहुल नार्वेकर यांनी अलिबागचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. 'मायनाक नगर' असे नवे नाव देण्याची त्यांनी मागणी केली आहे. राहुल नार्वेकर यांनी पत्रात लिहिलं आहे की, आपणांस विदित आहेच की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत सागरी संरक्षण आणि सागरी मोहिमांना अतिशय महत्व आहे.

पत्रात त्यांनी पुढे लिहिलं की, महाराजांनी दूरदृष्टीने बलाढ्य आरमाराची उभारणी केली. कोकणातील भंडारी समाजाचे नेतृत्व करणारे मायनाक भंडारी या शूर लढवय्याकडे त्यांनी समुद्रमार्गे स्वराज्याला धोका उद्भवल्यास सागरी सीमेचे संरक्षण करण्याची जबाबदारी सोपवली होती. अलिबाग येथील खांदेरी-उंदेरी बंदरावरील किल्ला आणि तेथील मायनाक भंडारी यांचा पराक्रम, चिवट संघर्ष यापुढे इंग्रजांना देखील माघार घ्यावी लागली होती. स्वराज्याचे आरमार आणि त्यासंदर्भातील इतिहास यातील मायनाक भंडारी यांच्या या पराक्रमाचे पर्व अतिशय ऐतिहासिक आणि पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे.

अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष मा.श्री. नविनचंद्र बांदिवडेकर, मुख्य सचिव मा.श्री. प्रकाश कांबळी, सह सचिव मा. श्री. वैभव तारी आणि प्रवक्ते मा. श्री. शशांक पाटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने माझी भेट घेऊन अलिबाग शहरासह तालुक्याचे "मायनाक नगरी" असे नामकरण करण्यात यावे तसेच मायनाक भंडारी यांचे अलिबाग शहरात भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तरी उपरोक्त मागणी अतिशय रास्त असून त्याची शासनस्तरावरून उचित दखल घेण्यात यावी आणि नामकरण, स्मारक उभारणी याद्वारे या मागणीची पूर्तता व्हावी, अशी शिफारस करीत आहे. असे राहुल नार्वेकर यांनी पत्रात लिहिलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com