Nanded Breaking : मोठी बातमी! नांदेडमध्ये अनेक गाव पाण्याखाली, 15 जण अडकले तर 40 ते 50 म्हशीचा पाण्यात बुडून मृत्यू
नांदेडच्या मुखेड तालुक्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद गावात पुराच्या पाण्यात बुडुन 40 ते 50 म्हशीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील अनेक गावात पाणी साचले आहे. ज्यामुळे लेंडी धरणाच्या बॅकवॉटरमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
अशातच नांदेडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या हसनाळ गाव पाण्याखाली गेले असून नांदेडच्या मुखेड तालुक्यात पाच ते सहा गावांना पुराने वेढा घातला आहे. गावातील 15 जण अडकल्याची माहिती समोर आली आहे.
त्याचसोबत देगलूर मुक्राबाद रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. यावेळी रस्त्यावर असलेली कार पाण्याखाली गेली आहे. दोरीच्या साह्याने पुराच्या पाण्यातून कार बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचसोबत एनडीआरएफ टीमच्या वतीने युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. याचपार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
ट्वीट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय लातूर, उदगीर आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. काल येथे झालेला पाऊस सुमारे 206 मि.मी. इतका होता. त्यामुळे रावनगाव, भासवाडी, भिंगेली, हासनाळ येथील जनजीवन प्रभावित झाले आहे".
"रावनगाव येथे 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून, त्यापैकी अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणाहून नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हसनाळ येथे 8 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. भासवाडी येथे 20 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. भिंगेली येथे 40 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत". 5 नागरिक बेपत्ता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे".
"मी स्वत: नांदेड जिल्हाधिकार्यांशी सातत्याने संपर्कात असून, नांदेड, लातूर आणि बिदर असे तिन्ही जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचाव कार्य करीत आहेत. एनडीआरएफची 1 चमू, एक लष्करी पथक आणि पोलिसांची चमू समन्वयातून बचाव कार्य करीत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून सैन्याची एक तुकडी सुद्धा रवाना झाली आहे. स्थानिक प्रशासनाला सातत्याने प्रभावित भागात राहून समन्वय साधण्यास सांगण्यात आले आहे".