Mumbai Rain Alert : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

Mumbai Rain Alert : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर शनिवारी सकाळपासूनच वाढला असून मुसळधार सरींमुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर शनिवारी सकाळपासूनच वाढला असून मुसळधार सरींमुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने मुंबईसह उपनगरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. उपनगरातील अंधेरी, गोरेगाव, मालाड, तसेच मध्य मुंबईतील दादर, कुर्ला, सायन या भागांत पाण्याचे मोठे साचलेले डोह दिसत आहेत. पावसामुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला असून लोकल गाड्या उशिरा धावत आहेत. सकाळच्या ऑफिसच्या वेळी झालेल्या पावसामुळे रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली आणि त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली.

मुंबईत प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी शक्यतो अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागही सज्ज ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनही सुरू आहे. मात्र मुंबईत वाढत्या पावसामुळे आंदोलनकर्त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे आंदोलनस्थळी पाणी साचल्याने उपस्थित कार्यकर्त्यांना त्रास झाला असून पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने व्यवस्थापन करण्यास सुरुवात केली आहे.

मुसळधार पावसामुळे सर्वाधिक फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसला आहे. नोकरी-धंद्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना प्रवासात दुप्पट वेळ खर्च करावा लागत आहे. अनेक वाहनं पाण्यात बंद पडल्याने लोकांना पायी प्रवास करावा लागत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या काही दिवसांत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com