Raj Thackeray Meets Uddhav Thackeray : 'मला खूप आनंद झालायं'; राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 65 व्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्याकरता मनसे अध्यक्ष आणि त्यांचे चुलत बंधू राज ठाकरे हे आज मातोश्रीवर दाखल झाले. सकाळपासूनच वांद्रे येथील मातोश्री या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांची गर्दी झाली असतानाच राज ठाकरे यांनीही अचानक मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांना सुखद धक्का दिला. राज ठाकरे मातोश्रीवर येताच खासदार संजय राऊत यांनी त्यांचे स्वागत केले. राज ठाकरे यांच्यासोबत बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हेदेखील उपस्थित होते. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोघांनी 20 ते 25 मिनिटं संवाद साधला. अवघ्या काही मिनिटांच्या भेटीनंतर राज ठाकरे मातोश्रीहून रवाना झाले. त्यांना बाहेरपर्यंत सोडण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः बाहेर आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या भेटीबाबत उद्धव ठाकरेंना विचारले असता मला खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी प्रसार माध्यमांसमोर दिली.
यापूर्वी याच महिन्यातील 5 तारखेला दोघे ठाकरे बंधू मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचे पाहायला मिळाले होते. हिंदी भाषा सक्तीविरोधात पहिल्यांदा राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित मेळावा घेतला होता. त्यांच्या या एकत्र येण्यावर शिवसैनिक आणि मनसैनिकांनी आनंद व्यक्त केला होता. तर भविष्यातही दोघे बंधू राजकीय पातळीवरही एकत्र येतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाल्यानंं राजकारणातही हे दोघे एकत्र येतील का, या चर्चांना उधाण आले आहे.