अयोध्येत येण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागा; राज ठाकरेंना भाजप खासदाराचा इशारा
मुंबई : मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील राजकारणाला एक वेगळं वळण दिलं आहे. राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेटम प्रमाणे काल राज्यात ठिकठिकाणी मनसे (MNS) कार्यकर्त्यांकडून हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचे कार्यक्रम आयोजित केले गेले होते. त्यानंतर आता मनसेचा पुढचा कार्यक्रम देखील चर्चेचं कारण ठरण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते 5 जुनला अयोध्येत जाणार आहेत. मात्र आता त्यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यातही वेगवेगळ्या अडचणी येण्याची शक्यता आहे. कारण जोपर्यंत ते उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.
हिंदुत्वादाची भुमिका घेतलेल्या राज ठाकरेंच्या मनसेने यापूर्वी परप्रांतीयांच्या मुद्दयावरुन अनेक वर्ष राजकारण केलं. याकाळात मनसे कार्यकर्त्यांनी खळखट्याक करत उत्तर भारतीयांना हकलण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे उत्तर भारतीय आणि राज ठाकरेंच्या मनसेमध्ये अनेकदा संघर्ष झाला होता. त्यानंतर आता भगवी शाल पांघरुन राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेतला आहे. राज्यात झालेल्या तीन सभांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज अयोध्येत जाणार आहेत. मात्र आता त्यांना त्यांच्या जुन्या भुमिकेमुळे अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही असा इशारा भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी दिला आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा हा दौरा देखील वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्ह दिसत आहेत.