Raj Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीवर अजुनही प्रश्नचिन्ह? मनसे-ठाकरे गटाच्या युतीमध्ये मोठा ट्वीस्ट
नुकताच 5 जुलैला पार पडलेला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा हा मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षासाठी ऐतिहासिक दिवस होता. वरळीतील NSCI डोम येथे हा विजयी मेळावा पार पडला असून लाखोंच्या संख्येने लोक तिथे उपस्थित होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र पाहिल्यानंतर तेथे उपस्थित कार्यकर्त्यांना आंनद आवरला नाही.
यावेळी दोन्ही भावांना एकत्र पाहून मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या युती बाबतच्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळाल आहे. मात्र याचपार्श्वभूमिवर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंनी या युतीबाबत अजूनही संभ्रम कायम ठेवला आहे. त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले असून युतीच्या चर्चा करण्याआधी मला विचाराव तसेच त्याशिवाय कोणीही काही बोलू नये अशा सुचना दिल्या आहेत. यापुढे कोणत्याही पदाधिकाऱ्याने युतीबद्दल सार्वजनिकपणे बोलण्यापूर्वी माझ्याशी संपर्क साधून परवानगी घ्यावी, असे निर्देश राज ठाकरेंनी दिले आहेत.
उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंसोबत युतीची भूमिका पाहायला मिळाली. हे त्यांच्या भाषणातून देखील जाणवत होत. त्यांनी भाषणादरम्यान म्हटलं होत की,"एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत" त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी हात पुढे केले असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. तर दुसरीकेडे राज ठाकरे आपल्या भाषणात मराठी भाषेचा मुद्दा धरुन ठेवला होता. त्यांच्याकडून युतीबाबत कोणतही स्पष्ट वक्तव्य ऐकायला मिळालं नाही. त्यामुळे युतीबाबत उद्धव ठाकरेंची इच्छा असली तरी राज ठाकरे त्यांचा सकारात्मक निर्णय घेणार का हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.