Raj- Uddhav Thackeray : राज ठाकरे 'मातोश्री'वर; त्या अडीच तासांच्या भेटीत काय घडलं?
थोडक्यात
ठाकरे बंधूंमधील गाठीभेटींचे प्रमाणही वाढू लागले
ठाकरे बंधू मुंबई महापालिकेच्या आखाड्यातही एकत्रच दिसणार ?
शिवसेना-मनसे युतीची घोषणा कधी होणार ?
मुंबई महापालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असतानाच, ठाकरे बंधूंमधील गाठीभेटींचे प्रमाणही वाढू लागले आहे. काही दिवसांपूर्वीच ‘मातोश्री’वर दाखल झालेले राज ठाकरे रविवारी आपल्या मातोश्रींसह पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर हजर झाले.आपल्या आईसह सहकुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘मातोश्री’वर पोहोचताच, त्यांनी शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आणि तुळशीचे रोप उद्धव ठाकरेंना भेट म्हणून दिले. या कौटुंबिक गाठीभेटीमागे युतीची बोलणी झाली असावी, अशी चर्चा सुरू आहे.
ठाकरे बंधू मुंबई महापालिकेच्या आखाड्यातही एकत्रच दिसणार, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळेच राज आणि उद्धव यांच्या गाठीभेटी वाढत असून अलीकडच्या काळातील या दोन प्रमुख नेत्यांमधील ही सहावी भेट ठरली. राज ठाकरे तसेच त्यांच्या आई, पत्नी शर्मिला, मुलगा अमित, सून मिताली आणि मुलगी उर्वशी असे संपूर्ण कुटुंब रविवारी ‘मातोश्री’वर पोहोचले होते. अडीच तासांच्या या भेटीत गप्पांनंतर स्नेहभोजनाचाही आनंद या दोन्ही कुटुंबांनी घेतला.
या भेटीनंतर राज ठाकरे म्हणाले की, “आईसोबत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मी माझ्या कुटुंबासोबत आलो आहे. ही कौटुंबिक भेट आहे.” राज आणि उद्धव यांच्या वाढत्या जवळीकीनुसार, मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट एकत्र येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्यामुळे, शिवसेना-मनसे युतीची घोषणा कधी होणार, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीचे शिष्टमंडळमतचोरीच्या मुद्द्यावरून येत्या मंगळवारी निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे.