Shivrajyabhishek Din 2023 : शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला राज ठाकरेंचा शिवप्रेमींसाठी संदेश म्हणाले...
रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. त्याला तिथीनुसार आज ३५० वर्षं पूर्ण झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तिथीनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडत आहे.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. . त्यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय मंडळींनी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर हजेरी लावली आहे.
याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवप्रेमींसाठी संदेश दिला आहे. राज ठाकरे म्हणाले की,
राज ठाकरेंचा संदेश जशास तसा
सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम जनतेला ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या मनापासून शुभेच्छा.
३५० वर्षांपूर्वी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा झाला तो काही साधासुधा राज्याभिषेक नव्हता. मध्ययुगातील इस्लाम आक्रमकांच्या काळात स्वतःच सार्वभौम राज्य असावं असं स्वप्न सुद्धा ह्या देशात जेंव्हा पडत नव्हतं तेंव्हा एका राजाने स्वराज्याची निर्मिती करून एका नव्या युगाची सुरुवात झाल्याची नांदीच दिली होती. त्यानंतर पार अटकेपार गेलेल्या मऱ्हाठा साम्रज्याची प्रेरणा असो की देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा हे महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्यच होती ह्यात शंका नाही. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात पण खरंतर हीच प्रेरणा असायला हवी होती, ती किती आहे हे आपण बघतच आहोत. असो.
तर मी आणि माझे सहकारी उद्या सूर्योदयाच्या आसपास महाराजांना रायगडावर जाऊन महाराजांना अभिवादन करणार आहोतच, पण माझी एक तीव्र इच्छा आहे.
ती म्हणजे हा सोहळा आणि त्याचा इतिहास, त्याचं महत्व आपण मराठी जनांनी जगाला ओरडून सांगायला हवं. आणि तेवढ्यावर न थांबता जातीपातीच्या पलीकडे जाऊन महाराजांच्या काळातील महाराष्ट्राचं गतवैभव परत आणण्यासाठी एकत्र यायला हवं, झटायला हवं. अन्यथा हा सोहळा फक्त एक उपचार होईल, उत्सव होईल !
बाबासाहेब पुरंदरेंचं एक खूप छान वाक्य आहे, परदेशात त्यांच्या महापुरुषांचे पुतळे उठसुठ बघायला मिळत नाहीत कारण ते महापुरुष, त्यांचे विचार, त्यांच्या रक्तात सामील झालेले असतात. आपल्याकडे महापुरुष, त्यांचे विचार आपल्या धमण्यामंध्ये सळसळत नाहीत म्हणून आपल्याला जागोजागी पुतळ्यांची गरज लागते.
हे चित्र बदलण्यासाठी, प्रत्येकाच्या मनात, रक्तात शिवाजी महाराज आणि त्यांचे विचार सामील झाले तरच महाराष्ट्राचं गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त होईल. ह्यासाठी मराठी जनांनी निर्धार करायला हवा, शपथ घ्यायला हवी आणि त्यासाठी राज्याभिषेक सोहळ्यापेक्षा उत्तम क्षण अजून कुठला असणार?
माझ्या पुन्हा एकदा शुभेच्छा. उद्या रायगडावर भेटूच.
आपला
राज ठाकरे