MNS : मनसेला मोठा धक्का! चार पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी, राज ठाकरेंचा कडक आदेश
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसला आहे. पक्षातील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी कारवाया व नियमभंग केल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट कारवाई करत चार महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यामध्ये कोकण संघटक आणि राज्य सरचिटणीस वैभव खेडकर यांच्यासह अविनाश सौंदलकर, संतोष नलवडे आणि सुबोध जाधव या नेत्यांचा समावेश आहे.
पक्षातून बडतर्फीचा आदेश
मनसेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार पक्षविरोधी कारवाया व पक्षाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खालील पदाधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात येत आहे. सर्व महाराष्ट्र सैनिकांनी याची नोंद घ्यावी.” या आदेशात संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांची नावेही नमूद करण्यात आली आहेत, मात्र ते आदेशावर सही करणारे जबाबदार नेते आहेत.
वैभव खेडकर यांची भाजपकडे झुकती कळा
गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात होता. अखेर या पार्श्वभूमीवर मनसेने त्यांच्यावर कारवाई करत हकालपट्टी केली आहे.
वैभव खेडकर हे मनसेतील जुने व प्रभावी नेते मानले जात. 2014 मध्ये त्यांनी दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. तसेच खेड नगरपरिषद निवडणूक जिंकून नगराध्यक्षपद भूषवण्याचे श्रेयही त्यांना जाते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे कोकणातील मनसेच्या संघटनाला मोठा फटका बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
आगामी निवडणुकांवर परिणाम?
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मनसेनेही या निवडणुकीत आपली ताकद दाखवण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, पक्षातील वरिष्ठ नेत्यांची गळती, पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी आणि भाजपकडे झुकती कळा यामुळे मनसेच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता राज ठाकरे या परिस्थितीला कशा प्रकारे सामोरे जातात, संघटनेत नवे चेहरे कितपत उभे राहतात आणि भाजपमध्ये गेलेल्या वैभव खेडकरांच्या प्रभावाला तोलणारी नवीन रणनीती तयार होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.