Raj Thackeray And Uddhav Thackeray : मातोश्रीवरील भेटीनंतर राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंचा मोठे बंधू म्हणून उल्लेख; म्हणाले, "माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख..."
आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे पक्षप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली. तब्बल 13 वर्षांनंतर राज ठाकरेंनी मातोश्री निवासस्थानी भेट दिली. हे दोघेही सध्या राज्यात सुरु असलेल्या मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र येऊ शकतात अशा शक्यता वर्तावल्या जात आहेत, तसेच या चर्चांना उधाण देखील येत आहे.
नुकताच 5 जुलै 2025 रोजी झालेला मराठीच्या मुद्द्यावर दोघांचा एकत्रित विजयी मेळावा संपुर्ण महाराष्ट्राने पाहिला. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर त्यांच्या भेटीला गेले होते. यावेळी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मनसे नेतेही राज ठाकरेंसोबत मातोश्रीवर दाखल झाले होते.
एवढचं नव्हे तर राज ठाकरेंनी एक्सवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंचा 'माझे मोठे बंधू' असा उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टद्वारे राज ठाकरे म्हणाले की, "माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या, कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...".
त्याचसोबत राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या खुर्चीला अभिवादन केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी राज ठाकरेंनी काही जुन्या आठवणींना उजाळा देखील दिल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीनंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा अधीक जोर धरुन असल्याचं पाहायला मिळत आहे.