Raj Thackeray
Raj Thackeray

ठाण्याच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले; " ज्यांनी बाळासाहेबांना अटक..."

माझ्या वडीलांना अटक करणारा माणूस आहे, या व्यक्तीसोबत मी बसणार नाही, असं तुम्हाला तेव्हा वाटलं नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.
Published by :

Raj Thackeray On Uddhav Thackeray : शरद पवारांनी महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणची सुरुवात केली. त्यांनी पहिल्यांदा काँग्रेस फोडली. पुन्हा याच शरद पवारांनी छगन भुजबळांना सोबत घेऊन बाळासाहेबांची शिवसेना फोडायला लावली. शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम शरद पवारांनीच केलं होतं. नारायण राणे यांच्यासोबत आमदार घेऊन काँग्रेसने पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली. ८५ वर्षांच्या म्हाताऱ्याकडे तलवार दिल्यावर हात थरथरतात, बाळासाहेबांना असं म्हणणाऱ्यांना तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रवक्त्या करता. त्यांना नेते करता आणि तुम्ही सांगता, तुमचं वडीलांवर प्रेम आहे. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता, तुम्ही भाजपमधून बाहेर पडल्यावर मंत्रिमंडळात तुम्ही छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसता. माझ्या वडीलांना अटक करणारा माणूस आहे, या व्यक्तीसोबत मी बसणार नाही, असं तुम्हाला तेव्हा वाटलं नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. ते ठाण्यात श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

राज ठाकरे पुढे म्हणाले, मी जेव्हा पक्षातून बाहेर पडलो, माननीय बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो. मी बाळासाहेब ठाकरे सोडून कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही, हे मी निश्चित केलं होतं. पक्षाला कितीही चढउतार आले, तर त्यातून मार्ग काढेन. शिवसेना आणि भाजप तुम्ही एकत्र निवडणूक लढवली. लोकांनी तुम्हाला युती म्हणून मतं दिली. निकाल लागल्यावर यांना कळलं यांच्यासोबत आपलं सरकार बसत नाही. अडीच-अडीच वर्षाचं उपमुख्यमंत्रिपदाचं काय, हे समोर आलं. चार भिंतीत ठरलं होतं, असं ते म्हणाले. तुम्ही आधी का बोलला नाहीत.

अमित शहांसोबत बैठक झाली होती आणि अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता, असं सांगतात. नरेंद्र मोदींनी त्यांच्या सभेत सांगितलं, आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहे. त्यावेळी तुम्ही आक्षेप का घेतला नाही. अमित शहाही असंच म्हणाले होते, त्यावेळीही आक्षेप का घेतला नाही. निवडणुकीचे निकाल लागल्यावर तुम्ही जगाला सांगत सुटले, आम्ही अडीच अडीच वर्षाचा करार केलेला. मग आधी का सांगितलं नाही तुम्ही. लाखो लोकांची मतं वाया घालवून तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बसलात.

ही पहिलीच लोकसभेची निवडणूक मी पाहतोय, ज्या निवडणुकीत विषयच नाहीत. लोकांच्या आयुष्याशी संबंधीत अनेक महत्त्वाचे विषय समोर आले पाहिजेत. वडील चोरले, या विषयावर निवडणूक चालू आहे. फोडाफोडीचं राजकारण मला मान्य झालं नाही आणि कधी होणारही नाही. तुम्ही म्हणता आमचा पक्ष फोडला आणि ज्या आघाडीत बसले आहेत, एकमेकांकडे पाहून स्वत:ला विचारा, आपण काय उद्योग केले आहेत, याच उद्धव ठाकरेंनी मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक खोके देऊन फोडले होते. तेव्हा काहीही वाटलं नाही. तुम्ही मागितले असते, तर दिले असते.

आपण १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहोत. आनंद मठात गेल्यावर सर्व जुने दिवस आठवले. माझे आणि आनंद दिघे यांचे मैत्रिपूर्ण संबंध होते. दिघेंसोबत ठाणे फिरताना मजा यायची. बाळासाहेबांसोबत मी ठाण्यात अनेकदा आलो. तेव्हा ठाणं एक टुमदार शहर होतं. महाराष्ट्रात वेगवेगळ्या राज्यातून लोक येत आहेत. तुम्हीही कितीही विकास करा, जोपर्यंत बाहेरच्या लोकांचे लोंढे महाराष्ट्रात यायचे थांबणार नाहीत, तोपर्यंत या शहरांमध्ये काहीही होणार नाही. बाहेरच्या लोकांचं येण्याचं सर्वात जास्त प्रमाण ठाणे जिल्ह्यात आहे. लोकसंख्येनुसार जिल्ह्याला एक महानगरपालिका आहे. ठाणे एकमेव जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यात सात-आठ महानगरपालिका आहेत. एका जिल्ह्यात एव्हढ्या महानगरपालिका आहेत. इकडच्या लोकांनी तर लोकसंख्या वाढवली नाही.

बाहेरून येणाऱ्या लोकांचं सर्वात जास्त प्रमाण हे ठाणे जिल्ह्यात आहे. इकडचा बोजा आवरण्यासाठी श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी लोकसभेत प्रश्न मांडावे. आम्ही उद्या इथे मेट्रो आणली, काहीही आणण्याचा प्रयत्न केला, तरी ते यशस्वी होणार नाही. जोपर्यंत ही लोकसंख्या वाढते आहे, तोपर्यंत हे पुरं पडणार नाही. या सर्व महानगरपालिका विस्टकलेल्या आहेत. त्या आणखी विस्कटून जाणार. शहरं चांगली झाली पाहिजेत. माझा विभाग, महाराष्ट्र चांगला झाला पाहिजे, म्हणून या निवडणुका आपण लढवतो. महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे, याबद्दल वादच नाही. गेले अनेक वर्ष अनेक अमराठी लोक राहत आहेत. प्रत्येक राज्याची जी राज्यभाषा आहे ती प्रत्येकाला बोलता आली पाहिजे. उद्या आम्ही तुमच्या राज्यात आल्यावर आम्ही तुमची भाषा शिकू, असंही राज ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com