Devendra Fadnavis : मार्कर पेन प्रकरणावर राज ठाकरेंचा आरोप, फडणवीसांचा टोला

Devendra Fadnavis : मार्कर पेन प्रकरणावर राज ठाकरेंचा आरोप, फडणवीसांचा टोला

मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज (१५ जानेवारी) सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र मतदान सुरू होताच मुंबईतून एक धक्कादायक आणि वादग्रस्त बाब समोर आली
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज (१५ जानेवारी) सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र मतदान सुरू होताच मुंबईतून एक धक्कादायक आणि वादग्रस्त बाब समोर आली असून, मतदान केल्यानंतर बोटावर लावली जाणारी शाई नसून थेट मार्कर पेनने रेष मारली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे ही मार्कर पेनची शाई सहज पुसली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे.

या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही तीव्र प्रतिक्रिया देत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. “शाईऐवजी पुसली जाणारी मार्कर पेन वापरणे म्हणजे मतदान प्रक्रियेची थट्टा आहे,” असा आरोप त्यांनी केला. या घटनेमुळे संभाव्य गैरप्रकारांची भीती व्यक्त केली जात असून, सोशल मीडियावरही याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा पाया आहेत. लोकशाही सुदृढ करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाले पाहिजे. मतदान हा केवळ अधिकार नसून ते आपले कर्तव्यही आहे. मतदान न करणं म्हणजे लोकशाहीतील आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे.”

फडणवीस पुढे म्हणाले की, “मी स्वतः मतदान केले आहे आणि महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमधील सर्व नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे. भरघोस मतदान झाल्यास चांगले लोकप्रतिनिधी निवडून येतात आणि त्यातूनच विकास घडतो. चांगली शहरे घडवायची असतील तर जनतेने मतदानात सक्रिय सहभाग घ्यावा.”

मार्कर पेनच्या वापराबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, “या सर्व बाबी निवडणूक आयोग ठरवतो. यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेनचा वापर करण्यात आलेला आहे. मात्र जर कुणाचा आक्षेप असेल, तर निवडणूक आयोगाने त्याची दखल घ्यावी.” तसेच त्यांनी टोला लगावत म्हटले की, “काही लोकं आधीच उद्याचा निकाल डोळ्यासमोर ठेवून, निकालानंतर दोष कुणाला द्यायचा याची तयारी करत आहेत, हे स्पष्ट दिसत आहे.” या संपूर्ण वादामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापले असून, निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com