Raj Thackeray
Raj ThackerayRaj Thackeray

Raj Thackeray : “देशात मनमानी सुरू...” मतमोजणी पुढे ढकलण्याचा निर्णयानंतर राज ठाकरेंची कडवी टीका

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठा बदल घडवणारा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं शुक्रवारी दिला. या निर्णयानुसार, राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे निकाल २१ डिसेंबर रोजी एकाच दिवशी जाहीर केले जाणार आहेत.
Published by :
Riddhi Vanne
Published on

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठा बदल घडवणारा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं शुक्रवारी दिला. या निर्णयानुसार, राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे निकाल २१ डिसेंबर रोजी एकाच दिवशी जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे २० डिसेंबरला अपेक्षित असलेली मतमोजणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. याशिवाय, न्यायालयानं २० डिसेंबरच्या मतदानानंतर अर्ध्या तासाने एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यासही परवानगी दिली आहे. या आदेशानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून आरोप-प्रत्यारोपांचा भडिमार सुरू आहे.

या निर्णयाविरोधात सर्वांत आधी प्रतिक्रिया आली ती मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून. नेहमीप्रमाणे थेट आणि स्पष्ट भाषेत त्यांनी केवळ चार शब्दांत सरकारवर निशाणा साधला,

“देशात मनमानी सुरू आहे.”

या छोट्याशा विधानातूनही त्यांनी सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न निर्माण केले.

दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या निर्णयावर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की न्यायालयाचा आदेश हा संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा “खेळखंडोबा” आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “राज्य सरकार आणि निवडणूक आयोग दोघांनी मिळून सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ काढला. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता धोक्यात आली आहे.”

वडेट्टीवार आणखी म्हणाले,

“निवडणूक आयोग सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहे.”

“मतमोजणी पुढे ढकलणं म्हणजे काहीतरी घडतंय याचा स्पष्ट संकेत आहे.”

“मत चोरीचा प्रकार तर नाही ना? निकाल बाजूने येणार नाही म्हणून वेळकाढूपणा सुरू आहे का?”

त्यांनी फडणवीस सरकारवर थेट हल्ला करत म्हणाले, “इतक्या निवडणुका झाल्या, पूर्वी कधीच असा प्रकार झाला नव्हता. लोकशाहीचा गळा घोटला जातोय.”

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनीही सरकारवर कठोर टीका करत या निर्णयाला “लोकशाहीला धक्का” असे म्हटले. त्यांच्या मते, निकाल पुढे ढकलल्यामुळे मतदारांमध्ये अविश्वास निर्माण होतो आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहतात.

या सर्व गदारोळाची पार्श्वभूमी अशी की, राज्यातील सुमारे २० नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. निकाल एकाच दिवशी जाहीर न झाल्यास या नगरपरिषदांच्या निकालावर परिणाम होऊ शकतो, अशी याचिका दाखल झाली होती. याच प्रकरणावर सुनावणीदरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला.

निवडणुकीचे निकाल पुढे ढकलले गेल्याने आता मतदार, उमेदवार आणि राजकीय पक्ष सर्वच संभ्रमात आहेत. विरोधकांनी उपस्थित केलेल्या गंभीर आरोपांमुळे हा विषय आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता असून राज्यातील वातावरण तापलेलेच राहणार आहे.

थोडक्यात

  • महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठा बदल घडवणारा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं शुक्रवारी दिला.

  • या निर्णयानुसार, राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे निकाल २१ डिसेंबर रोजी एकाच दिवशी जाहीर केले जाणार आहेत.

  • त्यामुळे २० डिसेंबरला अपेक्षित असलेली मतमोजणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com