Raj Thackeray : भैय्याजी जोशी यांच्या मराठी भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : भैय्याजी जोशी यांच्या मराठी भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

भैय्याजी जोशी यांच्या मराठी भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्यावर राज ठाकरे यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जोशींना मराठी अस्मितेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल आहे. ज्यावर आता विधानसभेत पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी विधानसभेत आवाज उठवला आहे, त्याचसोबत भैय्याजी जोशी यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. याचपार्श्वभूमिवर आता राज ठाकरे यांनी ट्वीट टाकत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांचे ट्वीट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं .

देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय ? भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं.... आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का ? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता... भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का ?

सध्या MMR रिजन मधे चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरवात होताना दिसत आहेत . हे काय चाललय हे न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं ! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडाव ?

आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला , त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येउन मराठीत बोलून गेले . त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये ? या असल्या काड्या घालून ( अर्थात राजकीय हेतू असल्या शिवाय हे होणे नाही ) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे ! बाकी सविस्तर ३० तारखेला गुढीपाडव्याला बोलूच !

महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं !

राज ठाकरे ।

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com