BrahMos Production Unit : 'पाकिस्तानला विचारा, ब्राम्होसची ताकद काय ?'; योगी आदित्यनाथनं सांगितलं BrahMos चं वैशिष्ट्य
जगातील सर्वात घातक ब्राह्मोस क्षेपणास्त्र लखनौमध्ये बनवले जाईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज, रविवारी ब्राह्मोस उत्पादन युनिटचे व्हर्च्युअल उद्घाटन केले. संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, परिस्थिती काहीही असो, देश कार्यरत राहील. भारत कोणत्याही परिस्थितीत आपले ध्येय साध्य करेल. ब्राह्मोस शत्रूंवर प्रहार करतो. लखनौमध्ये हा प्रकल्प फक्त ४० महिन्यांत पूर्ण झाला.
लखनौमध्ये बनवलेले ब्राह्मोस-एनजी क्षेपणास्त्र शत्रूचे लष्करी तळ नष्ट करेल. ब्राह्मोस-नेक्स्ट जेन क्षेपणास्त्र रडारला चकमा देण्यासदेखील सक्षम आहे. या क्षेपणास्त्राची गती, पल्ला आणि मारक क्षमता सध्याच्या ब्रह्मोसपेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. सध्याच्या ब्राह्मोसची मारा क्षमता २९० ते ४९० किमी आहे. तर ब्रह्मोस-नेक्स्ट जेन १५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर शत्रूला लक्ष्य करू शकेल. त्याचा वेग ताशी सुमारे ४३२१ किलोमीटर असेल. ब्राह्मोस-नेक्स्ट जेन सध्याच्या आवृत्तीपेक्षा ५० टक्के हलका आणि तीन मीटर लहान असेल. ज्यामुळे ते शत्रूच्या रडारच्या आवाक्याबाहेरही जाऊ शकेल. त्याचे वजन सुमारे १.५ टन आणि लांबी ६ मीटर असेल. हे क्षेपणास्त्र भारताच्या डीआरडीओ आणि रशियाच्या एनपीओ माशिनोस्ट्रोयेनिया यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, "ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा". ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल मुख्यमंत्री योगी यांनी सशस्त्र दलांचे अभिनंदन केले. संरक्षण मंत्री झाल्यानंतर राजनाथ सिंह पहिल्यांदाच लखनौला आले, तेव्हा पहिल्यांदाच लखनौमध्ये संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, ब्राह्मोस क्षेपणास्त्र बनवण्याचे काम लखनौमध्ये केले जाईल.