शहरात रक्षाबंधनच्या सणासाठी जोरदार तयारी सुरू आहे. बाजारपेठा आकर्षक सजावटीने सजल्या असून खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. बहिण-भावाच्या नात्याचा हा खास सण 9 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे.
यंदा राख्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 20 ते 25 टक्क्यांनी दर वाढले आहेत. साध्या 5 ते 10 रुपयांपासून सुरुवात होणाऱ्या राख्या आता 550 ते 600 रुपयांपर्यंत विक्रीस येत आहेत. तरीही महिलांचा खरेदीचा उत्साह कायम आहे.
महागाईमुळे जरी थोडा त्रास होत असला, तरी बहिणीने भावासाठी राखी घेणे थांबवलेले नाही. बाजारात अनेक महिला राखी खरेदी करताना दिसत आहेत. तसेच भावही बहिणींसाठी गिफ्ट खरेदी करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे बाजारात सणासारखीच लगबग आहे.
राख्यांमध्ये यंदा कुंदन वर्क, लाकडी, पपेट, कडा राखी यांसारख्या सोप्या आणि सुंदर राख्यांना जास्त मागणी आहे. देवांच्या प्रतिमा असलेल्या राख्याही महिलांना आवडत आहेत.
चिमुकल्यांसाठी छोटा भीम, डोरेमॉन, मोटू पतलू, श्रीकृष्ण, श्री गणेशा यांसारख्या कार्टून राख्यांची विक्री जोरात सुरू आहे. रात्री चमकणाऱ्या लायटिंग राख्याही मुलांना खूप आवडत आहेत.
बाजारातील विक्रेते सांगतात, "किंमती वाढल्या असल्या तरी ग्राहक कमी झालेले नाहीत. वेगवेगळ्या राख्या असल्यामुळे लोकं निवडून खरेदी करत आहेत." त्यामुळे त्यांनाही चांगला फायदा मिळतो आहे.
राखी खरेदीसाठी बहुतेक महिला दुकानातच जाऊन राख्या बघून व घेणं पसंत करत आहेत. ऑनलाईन राख्या मिळत असल्या तरी डिझाईन, रंग आणि क्वालिटी पाहण्यासाठी प्रत्यक्ष खरेदीला पसंती दिली जात आहे.
रक्षाबंधन हा फक्त एक धागा बांधण्याचा सण नाही, तर भावंडांच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचं प्रतीक आहे. बहिण भावाच्या हातात राखी बांधून त्याच्या रक्षणासाठी प्रार्थना करते.