Devendra Fadnavis : 'मी फेकलेली टोपी राऊतांनी ठाकरे बंधूना घातली...' फडणवीसांचा ठाकरे बंधूवर हल्लाबोल
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एका जाहीर सभेत बोलताना फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका करत, “मी फेकलेली टोपी राऊतांनी ठाकरे बंधूंना घातली,” असा खोचक टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वादंग माजण्याची चिन्हे दिसत आहेत.
फडणवीस म्हणाले की, “राजकारणात काही लोक कायम दुसऱ्यांची भाषा बोलतात. मी एक मुद्दा मांडतो आणि त्याची टोपी कुणीतरी दुसऱ्याच्याच डोक्यावर चढवतो. संजय राऊत हे नेहमीच असं करतात. मी फेकलेली टोपी त्यांनी थेट ठाकरे बंधूंना घातली आहे.” या वक्तव्याच्या माध्यमातून त्यांनी राऊतांवर चुकीचा अर्थ लावून राजकीय गैरसमज पसरवल्याचा आरोप केला.
यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट ठाकरे बंधूंवर टीकेची झोड उठवली. “तुम्ही इतकी वर्षे सत्तेत होतात, आता म्हातारे झालात. पण मुंबईचा विकास नेमका किती केला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुंबई महापालिकेवर अनेक वर्षे शिवसेनेचे वर्चस्व असतानाही मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि वाहतूक यासारख्या प्रश्नांवर अपेक्षित काम झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
फडणवीस म्हणाले, “मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मात्र या शहराचा विकास करण्याऐवजी फक्त भाषणं आणि राजकीय कुरघोडी करण्यात वेळ घालवण्यात आला. आम्ही सत्तेत आल्यानंतर मेट्रो, कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर लिंक, क्लस्टर डेव्हलपमेंट यांसारख्या प्रकल्पांना गती दिली.” ठाकरे बंधूंनी सत्तेत असताना या प्रकल्पांना विरोध केला, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी फडणवीस यांनी ठाकरे बंधूंनी केवळ भावनिक मुद्द्यांवर राजकारण केल्याचा आरोप केला. “मुंबईकरांना विकास हवा आहे, केवळ घोषणांचा बाजार नाही. आता जनता सर्व काही पाहतेय आणि योग्य वेळेला योग्य उत्तर देणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गट आणि मनसेकडून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून, आगामी महापालिका निवडणुकांच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांची धार आणखी वाढणार असल्याचे चित्र आहे.
