RBI Penalty : RBI ची कारवाई; HDFC बँक आणि श्रीराम फायनान्सला ठोठावला लाखोंचा दंड
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकिंग नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल दोन नामांकित वित्तीय संस्थांवर आर्थिक दंड ठोठावला आहे. HDFC बँकेवर 4.88 लाख रुपये, तर श्रीराम फायनान्स लिमिटेडवर 2.70 लाख रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे.
HDFC बँकेविरोधातील कारवाई
रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, HDFC बँकेने एका टर्म लोन व्यवहारादरम्यान परकीय गुंतवणुकीसंबंधीच्या भारत सरकारच्या नियमांचे उल्लंघन केले. यासंदर्भात RBI ने बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. बँकेने या नोटीसीला लेखी आणि तोंडी उत्तर दिले होते.
तपासणीअंती असे स्पष्ट झाले की, HDFC बँकेने "ऑथरायझ्ड डीलर" वर्गांतर्गत असलेल्या नियमानुसार योग्य प्रक्रिया पाळली नाही. यामुळे बँकेला 4.88 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
श्रीराम फायनान्सविरोधातील निर्णय
RBI ने 31 मार्च 2024 पर्यंतच्या श्रीराम फायनान्स लिमिटेडच्या व्यवहारांचे परीक्षण केले असता, डिजिटल कर्जवाटपासंबंधीच्या 2025 मधील नव्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. कर्जाच्या परतफेडीची रक्कम थेट कर्जदाराकडून न घेता तृतीय पक्षाच्या खात्यामार्फत घेतल्याचे आढळून आले, जे RBI च्या नियमानुसार अयोग्य आहे. या प्रकरणातही संस्थेला नोटीस बजावण्यात आली होती. संस्थेने स्पष्टीकरण दिले असले तरी RBI ने हे उल्लंघन गंभीर मानून 2.70 लाख रुपये दंड आकारला आहे.
केवळ नियामक बाबींसाठी कारवाई
RBI ने स्पष्ट केले आहे की, ही कारवाई ग्राहकांसोबतच्या व्यवहारांच्या कायदेशीरतेवर नव्हे, तर केवळ नियामक निर्देशांचे पालन न केल्यामुळे करण्यात आली आहे.