RCB Victory Parade : "तो जीवापेक्षा मोठा...";

RCB Victory Parade : "तो जीवापेक्षा मोठा..."; चेंगराचेंगरीत 11 जणांच्या मृत्युवर काय म्हणाले उपमुख्यमंत्री ?

विजयाच्या जल्लोषात हानी; उपमुख्यमंत्र्यांचे नागरिकांना शांततेचे आवाहन
Published by :
Riddhi Vanne
Published on

आयपीएल 18 व्या हंगामातील ट्रॉफीवर आरसीबीने ऐतिहासिक विजय मिळवला. तब्बल 18 वर्ष लागले आरसीबीला विजयी होण्यासाठी. आज 4 जून 2025 रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या (RCB)विजयानंतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विजयसोहळ्याला चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आणि कुठेतरी गालबोट लागले. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 33 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ही घटना संध्याकाळी 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान घडली. स्टेडियमची क्षमता केवळ 35,000 असताना सुमारे 2 ते 3 लाख लोकांनी एकत्र येताच गोंधळ उडाला. गेट क्रमांक 3 जवळ मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या घटनेमुळे परिसरात वाहतूक कोंडी देखील झाली. काही जखमींना तत्काळ शिवाजीनगरमधील बॉवरिंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत आणि जखमींवर मोफत उपचार जाहीर केले. त्यांनी मॅजिस्ट्रेट स्तरावरील तपासाची घोषणा केली असून चौकशीसाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X (पूर्वीचं ट्विटर) वर ट्विट करत म्हटलं, “बंगळुरूमधील ही दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.”

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी जखमींना रुग्णालयात भेट दिली. त्यांनी म्हटलं, “या घटनेनंतर आम्ही विजय सोहळा १० मिनिटांत आटोपता घेतला. आरसीबी विजयाचा अभिमान जरूर असू द्या, पण तो जीवापेक्षा मोठा नाही. नागरिकांनी शांतता राखावी.”

गृह मंत्री जी. परमेश्वर यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.आरसीबीने यंदाच्या IPL हंगामात गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्जला ६ धावांनी पराभूत करत पहिले विजेतेपद पटकावले. त्यानंतर बंगळुरूमध्ये विजयाचा जल्लोष सुरू होता. विधानसौधात मुख्यमंत्र्यांनी आरसीबीचा सत्कार केला, आणि त्यानंतर चाहत्यांसाठी मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

मात्र नियोजनाच्या अभावामुळे आणि अनियंत्रित गर्दीमुळे आनंदाचा सोहळा दु:खद दुर्घटनेत बदलला. राज्य सरकारकडून चौकशी सुरू असून प्रशासनाने जनतेला संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com