Pune Mumbai Ganpati Visarjan 2025 : मुंबई-पुण्यात अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाचा विक्रमी उत्साह
थोडक्यात
पुण्यासह राज्यभरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाची प्रचंड उत्साह
पुण्यात तब्बल 30 तासांहून अधिक काळ मिरवणूक सुरू आहे
मुंबईत गिरगाव चौपाटीसह विविध ठिकाणी भाविकांचा सागर उसळला आहे..
मुंबई, पुण्यासह राज्यभरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाची प्रचंड उत्साहात सांगता झाली. दहा दिवस चाललेल्या या उत्सवाचा शेवट भक्तिरसाने आणि जल्लोषाने झाला. यंदा मुंबई आणि पुण्यातील विसर्जन मिरवणुकांनी विक्रम मोडले. पुण्यात तब्बल 30 तासांहून अधिक काळ मिरवणूक सुरू होती, तर मुंबईत गिरगाव चौपाटीसह विविध ठिकाणी भाविकांचा सागर उसळला होता.
मुंबईत पावसाच्या सरींनी हजेरी लावली तरी भक्तांचा उत्साह अबाधित राहिला. शहरात एकूण 36,632 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. यामध्ये 5,855 सार्वजनिक गणेशमंडळे आणि 30,468 घरगुती गणपतींचा समावेश होता. काही ठिकाणी मात्र अपघातांच्या घटना घडल्या ज्यामुळे आनंदाला थोडासा धक्का बसला.
पुण्यातील मिरवणूक सकाळी 9:30 वाजता सुरू होऊन तब्बल दीड दिवस सुरू राहिली. मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन नियोजित वेळेत पार पडले. दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन रात्री उशिरापर्यंत झाले. शनिपार मंडळाने उभारलेला 35 फूट उंच देवमासा यंदाच्या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले.