तानाजी सावंत यांना दिलासा, 21 शुगर समूहाची याचिका फेटाळली
राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सावंत यांच्याविरोधात माजी मंत्री अमित देशमुख यांनी याचिका दाखल केली होती. आता याच याचिकेवर न्यायालयानं सावंत यांना दिलासा दिला आहे. जिल्हा बॅंकेने केलेली प्रक्रिया योग्य ठरवत ढोकीचा तेरणा साखर कारखाना सावंत यांच्या भैरवनाथ साखर समूहाला भाडेतत्वावर देण्याचे कर्ज वसुली न्यायाधिकरण कोर्टाने आदेश दिले आहेत. उस्मानाबादचा तेरणा कारखाना माजी मंत्री अमित देशमुख यांना चालवण्यासाठी हवा होता. मंत्री तानाजी सावंत आणि अमित देशमुख यांच्यात त्यासाठी स्पर्धा सुरु होती.
उस्मानाबाद जिल्हा बँकेनी राबवलेली टेंडर प्रक्रिया योग्य असल्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या 21 शुगर उद्योग समूहाची याचिका फेटाळली आहे. भैरवनाथ समुहाला आगामी 25 वर्षासाठी तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्याचा मार्ग मोकळा झाला.
एक वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर तेरणा कारखाना भैरवनाथ उद्योग समूहाला मिळणार आहे त्यासाठी जिल्हा बँकेने पुढील प्रक्रिया तात्काळ राबविणे गरजेचे आहे.