BMC Election 2026 : राजकीय प्रचाराचा परिणाम: मुंबईतील बिर्याणी, समोसे व वडापावच्या मागणीत जबरदस्त वाढ

BMC Election 2026 : राजकीय प्रचाराचा परिणाम: मुंबईतील बिर्याणी, समोसे व वडापावच्या मागणीत जबरदस्त वाढ

२०२६ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले
Published by :
Varsha Bhasmare
Published on

२०२६ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेससह इतर पक्षांनी प्रचारयंत्रणा सक्रिय करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगानेही शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पाडण्यासाठी युद्धपातळीवर तयारी केली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या २२७ वॉर्डांसाठी एकूण २,५१६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारीला मतमोजणी पूर्ण होईल. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचे ८४, भाजपचे ८२ आणि काँग्रेसचे ३१ नगरसेवक निवडून आले होते. यावेळी मात्र राजकीय समीकरणे बदलली असून, प्रत्येक पक्ष महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

निवडणूक प्रचाराचा थेट परिणाम मुंबईच्या खाद्यव्यवसायावरही दिसून येत आहे. प्रचाराच्या धामधुमीमुळे वडा पाव, समोसे, पुलाव आणि बिर्याणीच्या विक्रीत तब्बल २० ते २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांसाठी नाश्ता व जेवणाची मोठ्या प्रमाणात व्यवस्था केली जात असल्याने हॉटेल्स आणि खाद्यगृहांमध्ये प्रचंड मागणी वाढली आहे. अनेक ठिकाणी हॉटेल मालकांना अतिरिक्त कर्मचारी नेमावे लागत आहेत.

साकीनाका येथील भवानी वडा-पाव सेंटरच्या प्रमुख सरोज गुप्ता यांनी सांगितले की, सध्या त्यांच्याकडे नेहमीपेक्षा सुमारे २० टक्के जास्त ऑर्डर येत आहेत. वाढलेल्या पार्सल ऑर्डरमुळे दोन अतिरिक्त कर्मचारी ठेवावे लागले आहेत. अंधेरीतील एका बिर्याणी विक्रेत्याच्या मते, पुढील आठवड्यासाठी दररोज ४०० बिर्याणी पॅकेट्सची ऑर्डर मिळत आहे. यासोबतच चहा आणि नाश्त्याच्या विक्रीतही लक्षणीय वाढ झाली आहे.

इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR) च्या सदस्यांच्या मते, सध्या पदयात्रा आणि घरोघरी प्रचारामुळे लहान हॉटेल्सना जास्त फायदा होत आहे. आगामी काळात प्रचार बैठका आणि पक्ष कार्यालयांतील कार्यक्रम वाढल्यास मोठ्या हॉटेल्सचा व्यवसायही तेजीत येण्याची शक्यता आहे. एकूणच, मुंबई महानगरपालिका निवडणुकीने केवळ राजकारणच नाही तर शहरातील अर्थकारणालाही चांगलाच वेग दिला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com